Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Kolhapur › बेहिशेबी रकमेबाबत पुरावे दिल्यास चौकशीची व्याप्‍ती वाढवू

बेहिशेबी रकमेबाबत पुरावे दिल्यास चौकशीची व्याप्‍ती वाढवू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वारणानगर चोरीप्रकरणी सीआयडीचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सरचिटणीस अथवा वारणा शिक्षण मंडळ विश्‍वस्तांनी बेहिशेबी रकमेबाबत योग्य पुरावे दिल्यास चौकशीची व्याप्‍ती वाढविली जाईल, असे सीआयडीच्या वरिष्ठ सूत्रांनी मंगळवारी स्पष्ट केले. सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद उद्या (बुधवारी) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तपासाचा आढावा घेण्यात येणार आहे.

वारणानगर चोरीप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्लाने केलेल्या मूळ चोरीच्या गुन्ह्याचा तपास कोडोली पोलिस ठाण्याकडे, तर अधिकारी, पोलिसांनी केलेल्या चोरीप्रकरणी दोन गुन्ह्यांचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे.वारणा शिक्षण मंडळाच्या विश्‍वस्तांना अंधारात ठेवून पालकांकडून डोनेशन स्वरूपात घेतलेली बेहिशेबी रक्‍कम संस्थेचे सचिव जी. डी. पाटील यांनीच वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील ‘त्या’ खोलीत ठेवली होती. तीच 15 कोटी रुपयांची रक्‍कम चोरीला गेली आहे.

संबंधित रकमेची मालकी सांगून फिर्याद देणारे बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांची संबंधित रक्‍कम असल्याची तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे या रकमेबरोबरच सचिवांच्या मालमत्तांची, बँक खात्यांची सीआयडी चौकशी करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे प्रवक्‍ते विजयसिंह जाधव यांनी केली आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जाधव यांनी ही मागणी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारणा चोरीप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. तिन्ही गुन्ह्यांत आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

चोरी प्रकरणातील आरोपींविरुद्ध सीआयडीने भक्‍कम पुरावे उपलब्ध केले आहेत. सचिव जी. डी. पाटील व फिर्यादी सरनोबत यांच्या बेहिशेबी रकमेबाबत संबंधितांनी योग्य पुरावे, कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास चौकशीची व्याप्‍ती वाढविण्यात येईल, सीआयडीकडील कोणत्याही गुन्ह्याचा तपास आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांवर चालतो. त्यामुळे सकारात्मक पुरावे दिल्यास तपासाला गती देण्यात येईल. प्रवक्‍ते जाधव यांनी केलेल्या आरोपाची माहिती वृत्तपत्रांद्वारे मिळाली. पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक मोहिते यांच्याकडून निवेदन प्राप्‍त झाल्यास चौकशीची कार्यवाही केली जाईल, विशेष महानिरीक्षक रामानंद यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार्‍या बैठकीत तपासावर चर्चा होईल, असेही डॉ. बारी म्हणाले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, evidence, unaccounted money, increase, inquiry


  •