Thu, Jan 24, 2019 17:14होमपेज › Kolhapur › तरुणीचा जबरदस्तीने विवाह

तरुणीचा जबरदस्तीने विवाह

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजेंद्रनगरातील तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत तिचा विवाह जबरदस्तीने इचलकरंजीतील तरुणाशी लावून दिल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. पीडित मुलीला मारहाण करून जबरदस्तीने  विवाह लावून दिला. लग्नानंतर पतीने दुसर्‍याच दिवशी  तिला सोडून दिल्याने कुटुंबाची वाताहत होत आहे. पीडित मुलीवर सध्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

राजेंद्रनगरात राहणार्‍या महिलेला तीन मुली आणि मुलगा अशी चार अपत्ये आहेत. ती दीर, जाऊ आणि सासूसोबत राहते. पतीच्या निधनानंतर मुलांची जबाबदारी पेलवत नसल्याने मुलगा आणि मुलीला अनाथाश्रमात ठेवले. एका मुलीचा विवाह झाला, तर एक मुलगी तिच्याजवळ होती. या मुलीला फिट्सचा त्रास असल्याने तिचा विवाह लांबणीवर पडला आहे. अशात संबंधित महिला आजारी असल्याने सीपीआर रुग्णालयात उपचार घेत आहे. 

मुलीच्या नातेवाईक महिलेने इचलकरंजीतील नातेवाईकांकडे जायचे आहे, असे सांगून 22 फेबु्रवारीला तिला घरातून नेले. तिचा या ठिकाणी एका तरुणाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला; मात्र मुलीला फिट्सचा त्रास असल्याचे समजताच संबंधित तरुणाने तिला 24 फेबु्रवारीला कोल्हापुरात आणून सोडले. 

धमकीचा फोन
पीडित मुलीच्या हातावर मेहंदी असून हातात बांगड्याही आहेत. तिच्या नात्यातील महिलेने पैशासाठी तिचा जबरदस्ती विवाह लावून दिल्याचे आईने सांगितले. या घटनेनंतर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून संबधित महिलेला धमकीचा फोन आल्याचेही तिने पत्रकारांना सांगितले.