Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजच्या पोरीचा फुटबॉल पराक्रम 

गडहिंग्लजच्या पोरीचा फुटबॉल पराक्रम 

Published On: Mar 22 2018 5:56PM | Last Updated: Mar 22 2018 5:56PMरविराज गायकवाड, पुढारी ऑनलाईन

घरच्या कोणाची साथ नाही. घरची परिस्थिती बेताची असल्यानं वडिलांचा पोलिस भरतीसाठी आग्रह. पण, फुटबॉलवरचं प्रेम  स्वस्थ बसू देत नव्हतं. शेवटी शेजाऱ्यांकडून पैसे घेऊन पळून जाण्याची वेळ आली आणि थेट गुजरात गाठलं. ही स्टोरी फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या कोल्हापुरातल्या कुठल्या तरुणाची नाही. तर, एका अफाट जिद्दीच्या तरुणीची आहे. अंजू तुरंबेकर, असं त्या मुलीचं नाव आहे. तिनं फुटबॉल कोचसाठी अतिशय महत्त्वाची असणारी एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशनची ए लायसन्स परीक्षा पास होण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा पास करणारी अंजू आजवरची सर्वांत तरुण मुलगी आहे. देशात ही परीक्षा पास झालेल्या आजवर केवळ चारच महिला आहे. त्यात महाराष्ट्राची एकही नाही. त्यामुळं अंजूच्या पराक्रमाचं महत्त्व आणखी गडद होतंय.

अंजू आज, यशाच्या शिखरावर असली, तरी तिचा आजवरचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल असाच आहे. गडहिंग्लजजवळचं बेकनाळ हे अंजूचं गाव. गावातल्या इतर मुलींसारखचं तिच शिक्षण सुरू होतं. गडहिंग्लज हायस्कूलमध्ये असताना, शाळेत 'मुलींसाठीही फुटबॉलची संधी', अशी एक नोटीस लावण्यात आली होती. ती नोटीस वाचून फुटबॉलशी अंजूचा जुळलेला धागा अतूट असल्यासारखं वाटतं. 

नोटीस वाचून खेळायला गेलेल्या अंजूला घरातून विरोध झाला. वडिलांचा शेती व्यवसाय. त्यामुळं भावडांचं मोठ कुटुंब सांभाळणं कठीण जात होतं. त्यात दहावीला असलेल्या अंजूला फुटबॉलचं वेड लागल्यानं त्यांनी परवानगी दिली नाही. मग, दुपारनंतर शाळा चुकवून अंजू मास्टर्स स्पोर्ट्स क्लबमध्ये फुटबॉल खेळू लागली. त्याचवेळी १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघ निवडीसाठी ती मुंबईला गेली आणि तिची निवडही झाली. तिथं संतोष कश्यप यांनी अंजूला खूप प्रोत्साहन दिलं. तिथचं, फुटबॉलमध्ये करिअर करायचं निश्चित झाल्याचं अंजूनं पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय पातळीवर खेळताना अंजूने महाराष्ट्राची कर्णधार म्हणूनही भूमिका बजावली. पण, तिच्यात खेळाडू बरोबरच एक उत्तम खेळाडू घडविण्याची क्षमता असल्याचं तिला मुंबईत गेल्यानंतरच लक्षात आलं. 

बारावीनंतर वडील पोलिस भरती होण्यासाठी आग्रह करत होते. भरतीमध्ये उतरल्यानंतर लेखी परीक्षेच्या वेळी अंजू घर सोडून अक्षरशः पळून गेली. त्यानंतर दीड एक वर्षे पुण्यात एका क्लबसाठी खेळल्यांनंतर अंजूला मुंबईत संधी मिळाली. मुंबईत मॅजिक बस इंडिया फाउंडेशननं तिला कोचिंगसाठी संधी दिली. राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी धडपडलेल्या अंजूला मॅजिक बसमध्ये कोचिंग करिअरची गोडी लागली आणि तिचा वेगळा प्रवास सुरू झाला. घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा पैशांची चणचण असायची त्यामुळं वडिलधाऱ्या फुटबॉल खेळाडूंकडून मदत घ्यायची, असं करत अंजूनं आपलं काम सुरूच ठेवलं.  

मॅजिक बसकडे जवळपास सहा वर्षे काम केलेल्या अंजूनं नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये इंटरनॅशनल कोचिंग कोर्स केले. असे  आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कोर्स करणारी ती आजवरची पहिली भारतीय ए लायसन्स कोच आहे. डिसेंबर जानेवारीत भुतानमध्ये झालेल्या ए लायसन्स परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला आहे. त्याचा निकाल आल्यानं आजवर केलेल्या संघर्षाचं सार्थक झाल्याची भावना अंजू व्यक्त करते. आजवरच्या वाटचालीत कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, केएसए यांचे सहकार्य लाभल्याचं अंजूनं सांगितलं.

अंजू म्हणते, 
जो खेळ पूर्णपणे मुलांचा किंवा पुरुषांचा आहे. त्यात मी इथवर मजल मारली आहे. त्यामुळं मुलगी म्हणून मला कोणतीही सवलत नको आहे. आता इथून पुढं तळागाळांत जाऊन, नवे खेळाडू घडविण्यावर माझा भर असेल. देशासाठी खेळायचं स्वप्न होतं. पण, आता देशासाठी काम करते याचा अभिमान. 

अंजू सध्या करते काय?
- ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये ग्रास रूट डेव्हलपमेंटची हेड म्हणून कार्यरत 
- भारतात फुटबॉल तळागाळांत रुजविण्याच्या कामात अंजूचा सहभाग 
- मुलगी म्हणून मुलींनाच नव्हे, तर मुलांच्या संघांनाही प्रशिक्षण देण्याचे काम 
- सहा ते १२ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांना ट्रेनिंग देण्याचे काम
- देशाच्या कानाकोपऱ्यांत फुटबॉल पोहचविण्यासाठी अंजूची धडपड
- गेल्या वर्षीच्या 'एआयएफएफ'च्या मिशन इलेव्हन मिलिअन प्रोग्रमची टेक्निकल हेड

Tags : kolhapur district, Asian Football Confederation, Soccer, Rural Football talent, Football coach, Kolhapur Football, KSA, Football Grassroot programme