Tue, Apr 23, 2019 08:15होमपेज › Kolhapur › सामना मंडलिक-महाडिकच, पण झेंडा कुणाचा?

सामना मंडलिक-महाडिकच, पण झेंडा कुणाचा?

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 12:30AM
कोल्हापूर ः रणधीर पाटील

खा. धनंजय महाडिक आणि त्यांचे राजकीय विरोधक प्रा. संजय मंडलिक या दोघांमध्ये एक समान राजकीय धागा आहे, तो म्हणजे आगामी लोकसभा. निवडणूक ते कोणत्या पक्षातून लढविणार? हे त्यांचे कट्टर कार्यकर्तेही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. दोघांसमोरही ‘जर-तर’चे पर्याय आहेत. ऐनवेळी त्यांचे पक्ष वेगळे असू शकतात; पण दोघे एकमेकांविरोधात लढणार, हे मात्र नक्‍की आहे. दोन्ही नेत्यांनी त्याची तयारीही सुरू केली आहे. 

मंडलिक गटातर्फे रविवारी (दि.17) पुण्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या कोल्हापूरकरांचा आकुर्डीत मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. मंडलिक यांनी खा. धनंजय महाडिक यांच्यावर निशाना साधत प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख असणार्‍या प्रा. संजय मंडलिक यांची शिवसेनेकडून उमेदवारी पक्‍की समजली जात आहे. मात्र, मंडलिक शिवसेनेकडून लढतात की ऐनवेळी राष्ट्रवादीच्या तंबूत डेरेदाखल होतात, हे अगदी निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होणार असले तरी मंडलिक यांनी मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

‘जर-तर’चे राजकारण

कोल्हापूर महानगरपालिका  निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीचे  नेते आ. हसन मुश्रीफ आणि खा. धनंजय महाडिक यांच्यातील दुरावा वाढत गेला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तर मतभेदाची दरी आणखीनच रुंदावली. त्यानंतर आ. मुश्रीफ व खा. महाडिक यांच्यात पक्षांतर्गत टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अशा स्थितीत खा. महाडिक राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविणार का? लढवली तर पक्षातील नेते-कार्यकर्ते सहकार्य करणार का? हा प्रश्‍न आहेच. त्यामुळे खा. महाडिक यांनाही राष्ट्रवादीचे तिकीट अडचणीचेच ठरू शकते. 

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी मनभेदाची दरी कशी सांधणार? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळेच सोयीचा पर्याय किंवा राजकीय अपरिहार्यता अशा कुठल्याही कारणातून खा. महाडिक यांनी भाजपचा पर्याय निवडल्यास

महाडिक अन् मंडलिकही नसतील तर मग मुश्रीफच!

खा. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेच, तर ऐनवेळी लोकसभा उमेदवारासाठी धावाधाव होऊ नये, याची तजवीज आ. मुश्रीफ यांच्याकडून केली जात आहे. त्यातूनच ते प्रा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचे घोडे मिळेल त्या व्यासपीठावरून पुढे रेटत आहेत. मंडलिक हे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार झाले, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंडलिक गटाची रसद मुश्रीफ गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. जर मंडलिक यांनी शिवसेनेतूनच लढण्याचा निर्धार केला तर मात्र आ. मुश्रीफ यांना स्वत:च मैदानात उडी घ्यावी लागणार आहे.