होमपेज › Kolhapur › नगरपंचायत मागणीसाठी गारगोटीत कडकडीत बंद

नगरपंचायत मागणीसाठी गारगोटीत कडकडीत बंद

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:40PM

बुकमार्क करा

गारगोटी ः प्रतिनिधी

गारगोटी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे ग्रामपंचायत यंत्रणेला कठीण झाले असून, शहराच्या विकासाला मर्यादा येत आहेत. गारगोटी शहराच्या विकासासाठी शासनाने गारगोटी नगरपंचायत करावी, या मागणीसाठी मंगळवारी कृती समितीसह सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने पुकारलेल्या गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. 

गारगोटी हे भुदरगड तालुक्यातील मुख्य ठिकाण असून, येथे प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, दुय्यम उपनिबंधक कार्यालय, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यासह शासकीय, निमशासकीय कार्यालये असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. गारगोटी शहरात वास्तव्य करणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गारगोटी शहराचा विस्तार सुमारे 35 हजार लोकसंख्येच्या घरात पोहोचला आहे.  त्यामुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे.  शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे कृती समिती व सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने  बंदची हाक दिली होती.