Wed, Mar 27, 2019 04:14



होमपेज › Kolhapur › बिबट्‍याच्या तावडीतून सुटून विहिरीत पडलेल्‍या चितळास जीवदान

बिबट्‍याच्या तावडीतून सुटून विहिरीत पडलेल्‍या चितळास जीवदान

Published On: Apr 29 2018 6:23PM | Last Updated: Apr 29 2018 6:23PM



 गारगोटी : रविराज वि. पाटील

कारीवडे येथे एकाच दिवशी दोन वेळा चितळ विहिरीत पडूनही त्यास जीवदान मिळाले. बिबट्याच्या तावडीतून सुटून, विहिरीत पडूनही त्या चितळास जीवदान मिळाल्याने देव तारी त्यास कोण मारी याची चर्चा लोकांच्यात चितळाबाबत सुरू आहे. शनिवारी (दिनांक 28) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारीवडे येथील कुंभारकी या शेतात गणपती भाऊ दिवेकर यांच्या विहिरीत चितळ पडल्याचे शेतात काम करत असलेल्या जयराम कांबळे, बळवंत कांबळे व युवराज कांबळे यांच्या निदर्शणास आले. या तिघांनी दोराच्या सहाय्‍याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी चितळास बाहेर काढले. बाहेर पडता क्षणीच  चितळाने जंगल परिसरात धूम ठोकली. चितळाचे प्राण वाचवल्याच्या आनंदात शेतकरी पुन्हा आपल्या कामात गुंतले. सायंकाळी सहाच्या सुमारास या शेतक-यांना  चितळ गेलेल्या दिशेने बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. शेतकरी घराकडे परतत असताना त्याच कुंभारकी परिसरातील अर्जुन कृष्णा आदित्य यांच्या मालकीच्या  विहिरीत पुन्हा तेच चितळ बिबट्याच्या भीतीने पडल्याचे  शेतकऱ्यांना दिसले. विहिर खोल होती. त्यांनी दोराच्या सहायाने पुन्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु चितळ जखमी अवस्थेत होते. बिबट्याच्या पाठलागाने त्याची दिवसभर चांगलीच दमछाक झालेने ते भयभित अस्वस्थेत बसले होते. या दरम्‍यान रात्र झाल्‍याने त्यांनी वनपाल बी.एस.पाटील यांना याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल संदेश पाटील वनरक्षक रणजित पाटील, किरण पाटील आदींचे पथक रात्री कोंडोशी वनपरिसरात हत्तीच्या मागावर होते. हे पथक तातडीने कारीवडेत दाखल झाले. अखंड रात्र भर स्थानिक शेतकरी व वनकर्मचार्‍यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून तब्बल बारा तासानंतर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चितळास  विहिरी बाहेर काढण्यात वन विभाग व स्थानिकांना यश आले.

नर जातीचे दुर्मिळ चितळ

या चितळास दोनफुटाचे फाटे फुटलेले शिंग आहे. चितळाच्या पुढील डाव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शरीरावरावरही  दुखापत झाली आहे. चितळास तिरवडे येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून जिल्हा दुधसंघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी.मेटांगळे यांनी प्रथमोपचार केले. चितळास आणखीन काही दिवस वैधकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवणे गरजेचे असून, पुढील उपचारासाठी वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ठिकाणी चितळाची रवानगी केली जाईल असे वनक्षेत्रपाल संदेश पाटील यांनी सांगितले.