Mon, Apr 22, 2019 02:14होमपेज › Kolhapur › इचलकरंजीतील कचरा डेपो बनला ‘अग्निकुंड’

इचलकरंजीतील कचरा डेपो बनला ‘अग्निकुंड’

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 09 2018 11:06PMइचलकरंजी : वार्ताहर

येथील सांगली रस्त्यावरील कचरा डेपोतील कचर्‍याच्या ढिगार्‍याच्या समस्येबरोबरच या ठिकाणी वारंवार आगी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्येत आणखीन भरच पडली आहे. वारंवार लागणार्‍या आगींमुळे निर्माण होणार्‍या विषारी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात भागात पसरत असल्यामुळे नागरिकांना श्‍वास घेणेही मुश्कील बनत चालले आहे. कायमस्वरूपी आग नियंत्रण यंत्रणा बसवण्यासाठी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे; मात्र हा प्रस्ताव अद्याप पाणीपुरवठा विभागाकडे धूळ खात पडला आहे. त्यामुळे विषारी धुरापासून मुक्तता होण्यासाठी या प्रस्तावाचा गतीने पाठपुरावा होणे आवश्यक आहे.

इचलकरंजी शहरात दररोज 150 ते 175 टन कचरा निर्माण होतो. हा कचरा आसरानगर परिसरातील पालिकेच्या कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. या ठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेकडून उभारण्यात आला होता; मात्र या प्रकल्पाचाच सध्या कचरा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग निर्माण झाले आहेत. कचर्‍याच्या ढिगामुळे दुर्गंधीसह या ठिकाणी लागणार्‍या वारंवार आगींमुळे येथील रहिवाशांचे जगणे मुश्कील बनले आहे. 

कचर्‍याला मोठ्या प्रमाणात आग लागत असल्याने सुमारे दोन किलोमीटरच्या परिघात हा धूर पसरतो. परिणामी, भागातील नागरिकांना श्‍वसनाच्या, डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार असे प्रकार घडूनही पालिकेचे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्षच आहे. 

आग लागल्यास तात्पुरती उपाययोजना करून वेळा मारून नेली जाते. वारंवार लागणारी आग नियंत्रित करण्यासाठी पालिकेकडून तातडीने व ठोस उपाययोजना होत नसल्याने त्याचे दुष्परिणाम भागातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.