Sun, May 26, 2019 13:00होमपेज › Kolhapur › बाप्पांचे ‘बुकिंग’ एका क्‍लिकवर

बाप्पांचे ‘बुकिंग’ एका क्‍लिकवर

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गणपती बाप्पांच्या आगमनाला आता केवळ वीस दिवस बाकी राहिले आहेत. कुंभारवाड्यात बाप्पांची विविध रूपे दिसू लागली आहेत. विघ्नहर्त्या गणरायाला कोणत्या रुपात आपल्या घरी न्यायचे हे ठरवण्यासाठी आता बस एक क्‍लिक करण्याचा अवकाश आहे. कारण स्थानिक मूर्तिकारांकडून आपल्या नेहमीच्या ग्राहकांसाठी व्हॉटस् अ‍ॅपवर बाप्पांच्या छबी उपलब्ध करून दिल्याने बुकिंगही केवळ एका क्‍लिकवर होऊ लागले आहे. 

पूर्वी गणेशोत्सव जवळ आला की कुंभार गल्ल्यातून नागरिकांची वर्दळ वाढायची. विशेषत: नोकरी व्यवसायाची वेळ अटोपून सायंकाळी सात नंतर सहकुटुंब घरच्या गणपती बाप्पांची मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार गल्लीत दाखल व्हायचे. मूर्ती पसंत करून मूर्तीच्या प्रभावळी मागे आपले नाव कोरुनच ही मंडळी माघारी फिरायची. आता कुंभारगल्लीतील मूर्तिकाम अनेक मूर्तिकारांनी बापट कॅम्पला सुरू ठेवल्याने उत्सवापूर्वी आठवडा आधी मूर्ती दुकानात सजतात. रोजच्या धावपळीत नागरिकांनाही सहकुटुंब कुंभारगल्लीत येवून मूर्ती ठरवण्याचा वेळ काढणे कठीण बनले आहे. आपल्या नेहमीच्या ग्राहकांसाठी मूर्तिकारांनी व्हॉटस् अ‍ॅपवर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गणेशमूर्तींचे फोटो व्हॉटस् अ‍ॅपवर अपलोड केले जातात. अनेकजण स्टेटसला मूर्तीचे फोटो ठेवत आहेत. आपल्याला हवा असलेला फोटो निवडून तोच ठरवला जात आहे. कुंभार बांधवांकडूनही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या नावे ती मूर्ती ठरवून ठेवली जात आहे. 

मंडळांच्या बाबतीत मात्र हेच काम उलट चालते. मंडळांकडून हव्या त्या रुपातील गणरायाचा फोटो  मूर्तिकारापर्यंत पोहोचवला जातो. मंडळांच्या मागणीनुसार त्यांनी पाठवलेल्या फोटोच्या आधारे मूर्तिकाराकडून गणरायाची मूर्ती साकारली जात आहे.