Thu, Feb 21, 2019 13:51



होमपेज › Kolhapur › मंडपांच्या मोजमापांची पोलिसांना ‘ड्युटी‘

मंडपांच्या मोजमापांची पोलिसांना ‘ड्युटी‘

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:29PM



कोल्हापूर : प्रतिनिधी 

गुन्ह्यांचा तपास करणे, बंदोबस्ताची जबाबदारी, हद्दीत शांतता यासह अनेक जादा कामे पोलिसांच्या माथी मारण्यात येत आहेत. गणेशोत्सव तोंडावर असल्याने हद्दीतील मंडपांमुळे कुठे वाहतुकीला अडथळा येणार नाही, यासाठीही ठिकठिकाणी जाऊन पाहणी करावी लागत आहे. काही मंडळांनी एक खिडकी योजनेत भरलेल्या अर्जात नमूद नियम धाब्यावर बसविल्याने पोलिसांनाच ही डबल ड्युटी करावी लागत आहे. 

एक खिडकी योजनेमध्ये दिल्या जाणार्‍या अर्जांमध्ये मंडप किती आकाराचा करणार याची माहिती द्यावी लागते. काही मंडळांनी अर्जात नमूद मापांपेक्षा वेगळ्या आकाराचे मंडप उभे केले आहेत. तर केवळ प्रातिनिधिक स्वरूपात 4 खड्ड्यांची परवानगी मिळवून त्याचे पैसे भरून प्रत्यक्षात आठ- दहा खांबांचे मंडप उभारले आहेत. सर्व परवाने महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असले तरी याची पाहणी सध्या पोलिस दलाला करावी लागत आहे. 

अग्‍निशमन बंब, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवांना रस्ता ठेेवणे बंधनकारक आहे; परंतु अनेक मंडळांचे मंडप रस्त्याचा बहुतांशी भाग व्यापतात. यामुळे या सेवांवर परिणाम होणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंडप उभारणी करताना कोणत्याही अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाही हा कटाक्ष पाळला पाहिजे.