Wed, Feb 19, 2020 08:42होमपेज › Kolhapur › आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

तारामंडळातील (आकाशगंगा) तारे व पिंड यांचा वेग शास्त्रज्ञ न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धान्त व आईन्स्टाईनच्या सिद्धान्तानुसार कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी हा वेग जास्त असल्याचे निरीक्षण केले; मात्र सिद्धान्त मांडू शकले नाहीत. गोंदिया येथील आद्यौगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी गणिती प्रारूपाच्या आधारे संशोधन करून आकाशगंगेतील तारे, पिंडाच्या गतीचे कोडे उलगडले असल्याचा दावा गुरुवारी (दि. 7) कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

मुंडासे म्हणाले, आकाशगंगेत अतिदूर अंतरावर असलेले तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे अवकाश संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या निरीक्षणास आले. सर्वप्रथम जान हेन्‍रीक उर्ट यांनी 1932 रोजी याबाबत निरीक्षण केले. त्यानंतर 1970 पर्यंत हेरॉस बॅबकॉक, लुईस वोल्डर, वेरा रुबीन या शास्त्रज्ञांनी संशोधन करून तार्‍यांच्या अचूक गतीचे मापन करून निरीक्षण केले. यात सर्व तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे सिद्ध झाले. तार्‍यांच्या वेगाचे स्पष्टीकरण देता आलेले नाही. सद्यःस्थितीत कृष्णद्रव्यामुळे (डार्क मॅटर) हे तारे जास्त वेगाने फिरत असल्याची भावना शास्त्रज्ञांमध्ये आहे. यासाठी जगभरातील प्रयोगशाळांत प्रयोग सुरू असून कृष्णद्रव्याचे अस्तित्व शोधण्यात अपयश आले आहे. 

गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धान्त मांडला असल्याचे सांगून प्राचार्य मुंडासे म्हणाले, या सिद्धान्तामुळे आकाशगंगेतील तार्‍यांचा अधिक वेग सिद्ध करण्यात आला आहे. दीर्घकालीन तार्‍यांचा वेग आणि प्रत्यक्ष निरीक्षणानुसार आढळून येणार्‍या तार्‍यांचा वेग समान असून त्यात तफावत आहे. भौतिकशास्त्रातील हे मूलभूत स्वरूपाचे संशोधन असून जटिल प्रश्‍नांचा उलगडा झाला आहे. सिद्धान्तानुसार कृष्णद्रव्य नाही व गुरुत्वाकर्षण वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याचे निरीक्षण केले आहे.  आकाशगंगेतील केंद्राच्या जवळील व अतिदूर तार्‍यांचा वेगाची सिद्धान्तानुसार गणना करता येते. तसेच संपूर्ण आकाशगंगेचे वस्तुमान, रचनेची गणना करता येऊ शकते, असे प्राचार्य मुंडासे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कोल्हापूर आयटीआयचे माजी उपप्राचार्य एस. जे. कुलकर्णी, चंद्रशेखर खाडे, सचिन ऐनापुरे, विलास सुतार आदी उपस्थित होते.