होमपेज › Kolhapur › मतीमंद आकांक्षाला पाहताच अश्रुच्या धारा लागल्या!

मतीमंद आकांक्षाला पाहताच अश्रुच्या धारा लागल्या!

Published On: Apr 21 2018 7:34PM | Last Updated: Apr 21 2018 7:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी

चार वर्षाची मतीमंद मुलगी ‘आकांक्षा’ दृष्टीला पडताच केरबाच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा लागल्या.... कोवळ्या जिवाला कवेत घेताना झालेली घालमेल पाहून अन्य एका चिमुरडीसह पत्नीलाही रडू कोसळले.... बार्शीचा जालिंदर मुलांच्या आठवणीने व्याकूळ झाला होता. दोन दिवस रस्त्याकडे नजर लावून होता. एकही मुलगा ‘गळाभेटी’ला न आल्याने त्याची अवस्था केविलवाणी झाली होती... शुन्यात नजर हरवून ढसाढसा रडत होता...निमित्त होतं कळंबा कारागृहातील ‘गळाभेटी’च... 

क्षणिक राग असो अथवा क्षुल्लक कारण असो... हातून घडलेल्या गंभीर गुन्ह्यात कारागृहात चार भिंतीआड प्रायश्‍चित भोगताना काही क्षणासाठी बंदीजण आणि कुटुबांना एकत्रित आणून त्यांच्यात कौटुंबिक वातावरण निर्माण करण्याचा कारागृह अधीक्षक शरद शेळके व टीमने पायंडा पाडला आहे.

शनिवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या काळात जन्मठेप भोगणार्‍या 140 बंदीजणांच्या सोळा वर्षाखालील 215 मुला-मुलींची मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. व्ही. लव्हेकर व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबा कारागृहात गळाभेट झाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्या.उमेशचंद्र मोरे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जाधव आदी उपस्थित होते. कारागृह अधीक्षक शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत करून गळाभेटीचा उद्देश स्पष्ट केला.

बंदीजणासमवेत भोजनाचा आस्वाद

कुटुंबापासून चार हात दूर बंद कोठडीत जीवन व्यथित करणारे बंदीजण चिमुरड्या मुलाच्या ओढीने व्याकूळ झाले होते. प्रत्यक्ष भेटीत मुलांना कवेत घेऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात फिरवताना बंदीजणांसह चिमुरड्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. कारागृहाच्या पुढकाराने बंदीजणासमवेत सहभोजनाचा आस्वाद घेतला.

रजमानभाईचा गळा दाटून आला...

मुंबई बॉबस्फोटप्रकरणी आजन्म कारवास भोगणार्‍या बंदीवानाची पत्नी तीन मुलासमवेत केरळहून भल्या पहाटे कोल्हापुरात दाखल झाली होती. हुपरीतील रमजान आपल्या अपंग मुलाला भेटताना त्याचा गळा दाटून आला होता.