Wed, Jul 17, 2019 11:58होमपेज › Kolhapur › ...मला हे दत्तगुरू दिसले

...मला हे दत्तगुरू दिसले

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:05AM

बुकमार्क करा

गगनबावडा : प्रतिनिधी

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्‍वर..सामोरी बसले...मला हे दत्तगुरू दिसले.... अशी शाश्‍वत धारणा उराशी बाळगून आज, रविवारी लाखो भाविकांनी गगनबावडा येथील गगनगडावर दत्तजन्माच्या अपूर्व सोहळ्याचा आनंद उपभोगला. प.पू. गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या येथील दत्तजन्म सोहळ्याला आगळे महत्त्व आहे. गगनगड पठारावर खास उभारलेल्या शामियान्यात सायंकाळी दत्तजन्माचा मुख्य सोहळा पार पडला. मावळतीला निघालेल्या सूर्याच्या व उगवत्या चंद्राच्या साक्षीने सायंकाळच्या संधीप्रकाशातील हा विलोभनीय सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी गगनगड पठार भाविकांनी तुडूंब भरून गेले होते. 

दत्तजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गगनगडावर सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दत्तजयंती सोहळ्याचा आज मुख्य दिवस होता. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या’च्या जयघोषासह ‘दिगंबरा दिगंबरा दत्त गगनगिरी दिगंबरा’च्या जयघोषाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी गगनगड गेल्या चार दिवसांपासून गर्दीने फुलून गेला आहे. आज दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य दिवशी तर भाविकांचे लोंढे दिवसभर गगनगडाची वाट चढतानाचे दृष्य  पाहावयास मिळत होते. मुंबई, पाटण, सातारा, मनोरी, फलटण व कोकण प्रांतातून आलेल्या पायी दिंड्या आणि धनगरी ढोल यांने दिवसभर गगनगडाचे वातावरण भारून गेले होते.

यानिमित्त गगनगडावरील गगनगिरी आश्रमात पहाटेपासून काकड आरती, महारूद्र, दर्शनसोहळा व महाप्रसाद, महानैवेद्य सायंकाळी  दत्तजन्माचा मुख्य सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गगनगड पठारावर दुपारनंतर मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी राधानगरी येथील जयवंत पाटील यांनी बहारदार असे कीर्तन सादर केले. यावेळी श्रमिक सेवा मंडळ मुंबई, श्री दत्तजयंती उत्सव समिती पनवेल व श्रीक्षेत्र किल्ले गगनगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी  किल्ले गगनगडची दत्तजयंती व प. पू. गगनगिरी महाराजांचा महिमा याविषयी मार्गदर्शन केले. दत्तजन्माचा मुख्य  सोहळा सायंकाळी पार पडला.

यावेळी दळवी यांनी  दत्तजन्माचे कीर्तन केल्यानंतर  महिला भजनी मंडळाने पाळणा गायिला. त्यानंतर पाळण्यावर व पालखीवर फुले उधळण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. दत्तजन्म होताच प. पू. गगनगिरी महाराजांची पालखी आश्रमात नेण्यात आली. यावेळी बहारदार अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर धनगरी ढोलपथकाने सारे पठार दुमदुमून सोडले. गगनबावडा पोलिसांनी यानिमित्त चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. गगनबावडा एस. टी. आगाराने जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली. गगनगडावरील मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक खाडे यांनी केले. स्वागत संजय पाटणकर यांनी केले.

 दिवसभर ‘दिगंबरा दिंगंबरा’च्या जयघोषाने सारा परिसर भक्तिमय झाला होता. प्रतिवर्षाप्रमाणे वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. मयेकर यांनी मोफत आरोग्य तपासणी करून औषधपुरवठा केला. रात्री करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गगनबावडा येथील विठ्ठलाई मंदिराकडे जाणार्‍या रोडवर फोरव्हीलर आडवी लावून वाहतूक रोखल्याने पोलिस व भाविक यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.