Thu, Jul 18, 2019 16:39होमपेज › Kolhapur › अस्वस्थता अखेर संपली

अस्वस्थता अखेर संपली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

दि. 7 नोव्हेंबरच्या रात्री भडगावपैकी चोथेवाडी येथे राहणारे शिक्षक विजयकुमार गुरव बेपत्ता झाले. आंबोली घाटात एकाचा मृतदेह सापडला आणि गुरव यांच्या मुलांसह पत्नीने तो ओळखला; पण पोलिसांनी रिस्क नको म्हणून डीएनए केल्याशिवाय मृतदेहाचा ताबा देण्यास नकार देत तपासाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात गुरव यांची पत्नीही बेपत्ता झाली आणि या प्रकरणाचे गूढ वाढले. अखेर मंगळवारी पत्नीला प्रियकरासह अटक करण्यात आली आणि सगळा उलगडा झाला. त्यातूनच मृतदेह गुरव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि 20 दिवसांपासूनची अस्वस्थता अखेर संपली.  
गुरव हे रात्री कोणाचा तरी फोन आला म्हणून घरातून निघून गेल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने गडहिंग्लज पोलिसांत दि. 8 नोंव्हेबर रोजी दिली. त्यांच्या बेपत्ता होण्यानंतर ते राहात असलेल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. आंबोली येथे एक मृतदेह सापडतो काय... गुरव यांचा मुलगा मृतदेह वडिलांचा असल्याचे सांगतो...पोलिस डीएनए चाचणीशिवाय मृतदेह न देण्यावर ठाम...पाठोपाठ गुरव यांची पत्नीही गायब होते... पुन्हा मुले आई बेपत्ता झाल्याची फिर्याद देताना आईवरच संशय व्यक्त करतात..अशी अस्वस्थता असताना अखेर 20 दिवस सुरू असलेल्या खुनाच्या 
नाट्यावर पडदा पडला. गुरव यांचे मारेकरी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असून गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव व सुरेश चोथे हीच व्यक्ती या खून प्रकरणामध्ये असल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चांना मूर्त स्वरूप आले आहे.

गुरव हे 7 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलग्याने 8 रोजी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये बारकाईने तपास सुरू केला होता. याच दरम्यान आंबोली येथे दरीमध्ये एक मृतदेह मिळाल्यानंतर त्या मृतदेहाचे वर्णन हे बेपत्ता गुरव यांच्याशी जुळत असल्याने पोलिसांनी गुरव यांच्या नातेवाईकांना ओरोस येथे नेले. त्या मृतदेहाचा चेहरा चेंदामेंदा केल्यामुळे मृतदेह कोणाचा हे ओळखणे कठीण होते; मात्र हातातील धागा व पायाच्या बोटांवरून हा मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता डीएनए चाचणीशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याची भूमिका घेतल्याने गुरव कुटुंबीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. 

याच कालावधीमध्ये त्यांच्या शेजारी राहणारा सुरेश चोथे हा युवकही गायब झाल्याने या प्रकरणामध्ये काय झाले असेल, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये थेट तपास सुरू केला नसला तरी या संपूर्ण प्रकणातील संशयितांवर पोलिस नजर ठेवून होते. यामध्ये पुन्हा गावातल्या लोकांनी या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी केली. यापाठोपाठ गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी ही अचानकपणे घरातून गायब झाल्यामुळे प्रकरण आणखीणच गुंतागुंतीचे होत गेले. मुळातच डीएनए चाचणीशिवाय यामध्ये कोणालाही ताब्यात घेणे पोलीसांच्यादृष्टीने अडचणीचे असताना यातील एक एकजण गायब होवू लागल्याने समस्या वाढली होती.

या प्रकरणामध्ये मुलांनी 27 रोजी पुन्हा पोलीसांच्याकडे आपली आई 50 तोळे दागिने घेवून गायब झाली असून वडीलांच्या खूनप्रकरणामध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली. यामुळे या प्रकरणामधील गुंतागूंत वाढतच चालली असल्याने पोलीसांनीही मग यामध्ये तपासामध्ये प्रगती करत काल अखेर गायब झालेल्या या दोघांना मुंबई येथून लोअरपरेलमधून अटक केल. या दोघांच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक निघाली असली तरी याची चर्चा गेल्या 15 दिवसापासून गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार होत होती.

पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यावर आपण दोघांनीच अनैतिक संबधातून विजयकुमार गुरव यांचा खून केल्याचे कबूल केले. गेल्या 20 दिवसापासून गुरव यांच्या मृतदेहाच्या प्रतिक्षेत नातेवाईक असून आता थेट त्यांच्या खूनाची कबूली त्यांच्या पत्नीनेच दिल्यामुळे या प्रकरणातील अस्वस्थता संपली असून आता नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची प्रतिक्षा आहे. पोलीसांनी अदयाप मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नसून कदाचित उदया मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे. एकूणच गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या या नाटयाचा अखेर झाला असून आता यामध्ये पुढे आणखी काय उलगडा होेतो तो पहावा लागणार आहे...