होमपेज › Kolhapur › जीए-ग्रेस मैत्री सोळा वर्षांची, भेट मात्र कधीच नाही 

जीए-ग्रेस मैत्री सोळा वर्षांची, भेट मात्र कधीच नाही 

Published On: Aug 05 2018 10:48AM | Last Updated: Aug 05 2018 10:57AMमहादेव कांबळे : पुढारी ऑनलाईन

प्रतिभा ही वेडाची बहीण आहे म्‍हणतात. ते काही अर्थी खरेही असेल. प्रतिभावान माणसांच्या जगण्याच्या तर्‍हाही अनेक. प्रतिभावान लेखक, कवी, नाटककार, कादंबरीकार अशा माणसांच्या जगण्याच्या, प्रेमाच्या, मैत्राच्या अनेक गोष्टीतून ही माणसं गुढ राहिली आहेत. कधी सागरासारखं अथांग प्रेम तर कधी सगळ्यांपासूनच फारकत घेऊन स्‍व मग्न जगणं. अशाचपैकी मराठी साहित्यातील दोघा दिग्गजांच्या मैत्रीची विलोभनीय गोष्ट  आहे. 

कवी ग्रेस आणि साहित्‍्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या मैत्रीच्या जिव्‍हाळ्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ग्रेस आणि जीएंच्या सोळा वर्षाच्या या मैत्रीच्या प्रवासात दोघंही एकमेंकांना प्रत्यक्षात कधीच भेटले नाहीत. भेटले ते फक्‍त पत्रातून. सोळा वर्षाच्या कालावधीत कधी ग्रेस जीएंना भेटल ना कधी जीए ग्रेसना भेटले. प्रत्यक्षात भेटीगाठी झाल्या नसल्यातरी त्यांनी आपल्यातील ऋणानुबंध पत्रातून कायम ठेवला. जीए आणि ग्रेस यांनी आपल्या मैत्रीतील ऋणानुबंध फक्‍त आपल्या पुरताच मर्यादित ठेवला असं नाही तर तो आपल्या कुटुंबापर्यंतही जिवंत ठेवला. 

१५ नोव्हेंबर १९७१ ते १० जुलै १९८७ जीए आणि ग्रेस यांच्या जिव्‍हाळ्याची ही  सोळा वर्षे. या काळात त्यांनी एकमेकांना अनेक पत्र लिहिली. जीएंच्या निधनानंतर त्यांचा हा पत्रठेवा पुस्तकरूपाने चार खंडांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रकाशितही करण्यात आला आहे. या खंडात त्यांच्या पत्ररूपी मैत्रीचे अनेक किस्‍से पाहायला मिळतात. एकमेकांच्या प्रतिभाशाली साहित्याविषयी तेवढ्याच आपुलकीनं आणि तटस्‍थपणं बघितलं जातं. त्यांच्या या पत्ररूपी मैत्रीची जेव्‍हा दोघांच्या कुटुंबियांनी दखल घेतली तेव्‍हा त्या नात्यात आणखी गोडवा येत गेला. ग्रेस यांच्या मुलीने जीए यांच्या वाढदिवसाला तारेने पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या तेव्‍हा जीए भारावून गेले असंही ते लिहितात. त्यानंतर त्या पत्राला उत्तर देताना तिला आपल्या वडीलांची काळजी घ्यायला सांगातात आणि काही गोष्टीबद्दल तिच्याशी मतभेदही व्‍यक्‍त करतात. 

या मैत्रीविषयी ग्रेस यांच्या साहित्यावर संशोधन केलेले प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार सांगतात, ग्रेस आणि जीए यांची मैत्री हा मैत्रीपूर्ण नात्यापल्‍याडचा अनुबंध आहे. दोघांचीही पत्रमैत्री पक्‍की होती. एकमेकांच्या प्रतिभाशाली स्‍नेहपूर्ण नात्याने स्‍वाकारले होते. ग्रेस यांची शब्दउंची आणि जीए यांचा गूढ शब्दप्रवास यामुळेच त्यांची मैत्री जिव्‍हाळ्याच्या धाग्यात गुंफली होती.  

पत्ररूपी या मैत्रीमध्ये जीए आणि ग्रेस दोघंही कधी प्रत्‍यक्षात भेटले नाहीत मात्र हे त्यांचे नाते आयुष्यभर त्यांना सुखवणारे होते. अशा या त्यांच्या मैत्रीचा ऋणानुबंध मात्र कायम राहिला आहे. त्यांच्या या मैत्रीचा ठेवा "जीएंची पत्रवेळा" चार खंडात प्रकाशित करण्यात आला आहे.