होमपेज › Kolhapur › दुर्गम भागातील विद्यार्थिनींना एस.टी. पाससाठी निधी देऊ

दुर्गम भागातील विद्यार्थिनींना एस.टी. पाससाठी निधी देऊ

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:52AMकोल्हापूर: प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाने प्रायोगिक तत्त्वावर कार्यक्षेत्रातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील एक हजार विद्यार्थिनींच्या एस.टी. पासचा वार्षिक खर्च करण्याची योजना आखली आहे. ही महत्त्वाची योजना असून, योजनेसाठीचा पहिल्या वर्षातील निधी लवकर उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षातील प्रलंबित मागण्या व काही नवीन प्रस्तावांच्या अनुषंगाने सोमवारी विद्यापीठात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जाहीर योजनांसाठी राज्य सरकारकडून घोषित निधी लवकर प्राप्‍त होण्यासाठी सहकार्याची अपेक्षा पालकमंत्र्यांकडे केली. विद्यापीठातर्फे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह प्रस्तावित आहे. आवश्यक निधीसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत विशेष बैठक घेऊन यासंदर्भातील कार्यवाही प्राधान्याने करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली. विद्यापीठाने दुर्गम भागातील 50 महाविद्यालयांत स्वच्छतागृह उभारणीची योजना प्रस्तावित केली आहे. यासाठी महाविद्यालयांची निवड करून अंतिम प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शिवाजी विद्यापीठातर्फे प्रस्तावित अल्पसंख्याक विद्यार्थी वसतिगृहासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागासमवेत विशेष बैठक घेऊन आवश्यक तरतुदीसाठी सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाहीही यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, शैक्षणिक सल्‍लागार डॉ. डी. आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.