Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Kolhapur › गांधीनगरमध्ये सरपंचांच्या निषेधार्थ मोर्चा

गांधीनगरमध्ये सरपंचांच्या निषेधार्थ मोर्चा

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:29PMगांधीनगर : वार्ताहर

गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांच्या हुकूमशाही वृत्तीच्या व अतिक्रमणावर त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ विविध सात पक्ष, संघटनांनी बुधवारी मोर्चा काढला. यावेळी त्यांचा निषेध करण्यात आला.  ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या उत्तराने आंदोलकांचे समाधान न झाल्याने ग्रामपंचायत बरखास्तीसाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला. 

आंदोलकांच्या मुद्देसूद प्रश्‍नांना उत्तरे देताना ग्रामविकास अधिकारी जयपाल गायकवाड यांची भंबेरी उडाली. अतिक्रमणावरील कारवाई कायदेशीर कशी, हे त्यांना स्पष्ट करता आले नाही. सरपंच रितू लालवाणी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी केलेली कृती कायदेशीर की बेकायदेशीर याबाबतच्या त्यांच्या असंदिग्ध उत्तराने मोर्चेकरी संतप्त झाले.

मोर्चाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाला. शिवसेना, महालक्ष्मी वुमेन्स फौंडेशन व पर्यावरणवादी महिला संघटनेचे कार्यकर्ते निषेध फलक, विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरपंच रितू लालवाणी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. झाडांची कत्तल करणार्‍या सरपंचांवर कारवाई करा, दलित वस्तीची पाणी, वीज तोडणार्‍या ग्रामपंचायतीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सिंधू मार्केटमार्गे आंदोलक ग्रामपंचायतीकडे आले. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ग्रामपंचायतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येण्याची ही पहिलीच वेळ होती. 

 घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला कार्यकर्ते सरपंचांना बोलवा, आम्ही त्यांना जाब विचारू, अशी मागणी करू लागले. त्यावर शिवसेनेचे जितू कुबडे, वीरेंद्र भोपळे, रिपब्लिकन पक्षाचे अंकुश वराळे, दलित महासंघाचे आप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ, बंडखोर सेनेचे राजू कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे चंदू नागावकर, अविनाश कांबळे, महालक्ष्मी वुमेन्स फौंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने व पर्यावरणवादी महिला संघटनेच्या रोमा धामेजा आदी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी सरपंचांच्या कक्षात चर्चा झाली. त्यावेळी आप्पासाहेब कांबळे यांनी कारवाई कशी बेकायदेशीर असल्याचा पाढा वाचला; पण त्यावर सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांना जबाबदारीने उत्तरे देण्यात आली नाहीत, असे म्हणाले.
त्यानंतर चंदू नागावकर यांच्या प्रश्‍नांना रितू लालवाणी यांनी थातूर-मातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. टपरी धारकांवर झालेली कारवाई बेकायदा असल्याचा मुद्दा वीरेंद्र भोपळे यांनी मांडला. टपर्‍या काढल्याने नाष्टाही मिळत नाही, त्यामुळे ज्यांच्या जीवावर बाजारपेठ चालते त्यांचाच गळ्याचा घोट घेण्याची  कृती ग्रामपंचायतीने केली, असा आरोप जितू कुबडे यांनी केला. वनखात्याची परवानगी न घेता व कोणतीही नोटीस न देता झाडे व बगीच्याची कत्तल कोणत्या कायदेशीर आधारावर केली, यावरीलही सरपंचानी जे उत्तर दिले ते अयोग्य व उद्दामपणे असल्याचे हेमलता माने यांनी बजावले. पर्यावरणवादी महिला संघटनेच्या रोमा धामेजा यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा  समाचार घेतला.

सरपंच रितू लालवाणी यांनी ‘ग्रामपंचातीने केलेल्या ठरावानुसार ही कारवाई झाली आहे. यामध्ये कोणतीही मनमानी झालेली नाही. कायद्यानुसार कारवाई झाली आहे’ असे सांगितले. परंतु, त्यांच्या या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही. अखेर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. दलित महासंघाचे मोहन बोराडे व नबीसाहेब नदाफ यांनी हा निर्णय जाहीर केला. 
माजी सरपंच दीपक शर्मा यांना हेमलता माने यांनी सरपंच कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर शर्मा यांनी नकार दिला. महिला आंदोलक संतप्त झाल्याने शर्मा यांना बाहेर जाणे भाग पडले. त्यावेळी शर्मा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात 
आल्या.