Thu, May 28, 2020 09:19होमपेज › Kolhapur › विक्रीकर निरीक्षक परीक्षेत कोल्हापूरची बाजी

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत कोल्हापूरची बाजी

Published On: Dec 14 2017 9:52PM | Last Updated: Dec 14 2017 9:52PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत कोल्हापूरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. प्राची सखाराम भिवसे या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत. अहमदनगर येथील दादासाहेब सुखदेव दराडे हे मागास प्रवर्गात प्रथम आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक संवर्गातील १८१ पदासाठी दि. ३ जून २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. ‘एमपीएससी’ चे उपसचिव विजया पडते यांनी गुरुवारी (दि.१४) निकाल जाहीर केला. सर्वसाधारण प्रवर्गातून किशोर यादव (व्दितीय), प्रशांत शिंदे (तृतीय क्रमांक) मिळविला आहे. कोल्हापुरातील एचएससी बोर्ड जवळील पद्मा कॉलनीत राहणार्‍या प्राची भिवसे यांनी महिला प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भिवसे यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बीटेक केले आहे. जानेवारी २०१५ पासून राज्यसेवा परीक्षा अभ्यासास सुरुवात केली. एक गुणाने विक्रीकर निरीक्षक परीक्षा अनुत्तीर्ण ठरल्यानंतर जोमाने अभ्यास केला. त्यानंतर झालेल्या परीक्षेत अव्वल ठरत राज्यात पहिले येण्याचा मान मिळविला आहे.

शिवाजी विद्यापीठ भूगोल अधिविभागातील एमए उत्तीर्ण असलेल्या प्रवीण बळीराम पाटील (रा. म्हाळुंगे ता. करवीर) हे १३६ गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. विक्रीकर निरीक्षक पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३३, एससी ११७, एसटी११७, डीटी १२३, एनटी (बी) १२१, एनटी (सी)१२९ व ओबीसी १२९ व फिजीकली हँण्डीकॅप्ड १२४ कट ऑफ राहिला आहे. 

आई वडिलांचे स्‍वप्‍न साकार 

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आल्याने खूप छान वाटत आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यावर न थांबता राज्यसेवा परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे प्राची भिवसे यांनी सांगितले.