Thu, Apr 25, 2019 12:18होमपेज › Kolhapur › एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास

Published On: Sep 12 2018 9:31PM | Last Updated: Sep 12 2018 9:31PMकोलापूर : प्रतिनिधी

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसह वर्षातील सहा महिने मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ही मागणी रावते यांनी मान्य करून त्या कर्मचाऱ्यांना गणेश आगमनाच्या मुहूर्तावर 'सुख वार्ता ' दिली आहे.  

एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या २५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पाससाठी मागणी केली आहे. सेवेमध्ये असताना दररोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष देता न आल्याने, किमान निवृत्तीनंतर तरी कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालवावेत, सपत्नीक धार्मिक - पर्यटन, देवदर्शन, नातेवाईकांना भेटावे यासाठी प्रवास हा अनिवार्य आहे. परंतु परिस्थिती अगदीच बेताची असल्याने दळण-वळणासाठी एसटी शिवाय पर्याय नाही. ज्या एसटीची ऐन  उमेदीत प्रामाणिक सेवा केली. त्या एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची 'सशुल्क' का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रावते यांच्याकडे केली होती. 

एकेकाळी एसटीच्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या व गेली ७० वर्षे ज्या कर्मचाऱ्यांनी मनोभावे सेवा करून एसटी सांभाळली, वृद्धिंगत केली त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तर वयात 'सशुल्क' प्रवास- पास न देता वर्षातून सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचा निर्णय दिवाकर रावते यांनी घेतला आहे. या निर्णयास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान राखत संमती दिल्याने रावते यांनी त्यांचे आभार मानले आहेत. गणेश आगमनाच्या मुहूर्तावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या शुभवार्तेने सुखद धक्का  बसला असून त्यांनी रावते यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.