Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Kolhapur › रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 1:22AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामासाठीची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून, तीस महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट आहे. भूसंपादनाचे काम सुरू असतानाच  निविदा प्रसिद्ध झाल्याने चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला गती प्राप्‍त झाली आहे. हा महामार्ग चौपदरी झाल्याने कोकण आणि घाटमाथा प्रदेशाच्या दळणवळणाचा राजमार्ग खुला होणार असून, त्यामुळे डोंगरी भागाच्या विकालासा गती मिळण्याची अपेक्षा आहे.

रत्नागिरीच्या मिर्‍या येथून या चौपदरी महामार्गाची सुरुवात होणार आहे. मिर्‍या ते हातखंबा आणि तेथील गोवा महामार्ग वगळून पाली ते साखरपा असा पहिला टप्पा आहे. 48.100 किलोमीटरच्या या चौपदरीकरणासाठी 1 हजार कोटी 67 लाख 13 हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. साखरपा ते केर्ले (ता. शाहूवाडी) हा महामार्ग आंबा घाटातून जात आहे. त्यानंतर केर्ले ते पैजारवाडी (ता. पन्हाळा) हा दुसरा टप्पा 36.700 किलोमीटरचा आहे. या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी 854 कोटी 61 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. तर तिसरा टप्पा पैजारवाडी ते केर्ले, भुये, शिये (ता. करवीर) मार्गे चोकाक (ता. हातकणंगले) येथपर्यंत 33.300 किलोमीटरचा आहे. त्यासाठी 837.11 कोटी रुपयांची निविदा आहे.

या संपूर्ण 144.300 किलोमीटरच्या चौपदरी महामार्गावर काही ठिकाणी बोगदे, तर काही ठिकाणी उड्डाणपूल आहेत. मलकापूर आणि बांबवडे गाव वगळून बाह्यवळण रस्ता (बायपास) आहे. त्याचप्रमाणे हा चौपदरी महामार्ग कोल्हापूर शहर वगळून आहे. केर्ले (ता. करवीर) येथून डावीकडे निगवे, भुये, शियेमार्गे बाह्यवळण रस्ता (बायपास) राहणार आहे. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक बी. एस. साळुंके आणि उपव्यवस्थापक ए. टी. गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चौपदरी महामार्गाचे अंतिम टप्प्यातील सर्वेक्षण सुरू आहे. भूसंपादन आणि शेतकर्‍यांना आर्थिक मोबदला देण्याबाबतची कार्यवाही सुरू असतानाच निविदा प्रसिद्ध करून चौपदरी काम पूर्ण होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साळुंके व गोरड यांनी सांगितले. या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर रत्नागिरी, देवगड या बंदरांसह संपूर्ण कोकण प्रदेश घाटमाथ्यावरील प्रदेशाला जोडला जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर असा हा महामार्ग आहे.

सरकार-कंत्राटदार हिश्श्यानुसार काम
चौपदरीकरणाच्या तीन टप्प्यांसाठी तीन निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या पाच फेब्रुवारी 2018 रोजी उघडल्या जाणार आहेत. सरकारी आणि कंत्राटदार हिस्सा या तत्त्वानुसार निविदा मागविण्यात आली आहे. जी कंपनी सरकारी हिस्सा कमी आणि स्वतःचा हिस्सा अधिक गुंतविण्यास तयार आहे, त्या कंपनीलाच हे काम मिळेल, अशी शक्यता आहे.