Fri, Jul 19, 2019 01:35होमपेज › Kolhapur › माने मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

माने मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:43AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

राजाराम माने याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यासह पाच संशयितांना अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी शिरोळ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या प्रकरणातील संशयित आरोपी पो.कॉ. भूजिंग कांबळे (शिरोळ पो. ठाणे) याच्यासह निखिल ऊर्फ भाऊ खाडे (वय 29) व शशिकांत साळुंखे (वय 36,  दोघे रा. घालवाड) तसेच संशयित विवाहित महिला स्वाती दशरथ माने (वय 24, रा. मसोबा गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी) या चौघांना पोलिसांनी अटक केली.

संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात  हजर केले असता, सर्वांना 14 डिसेंबरपर्यंत (सात दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील पाचवा संशयित शिंदे नामक व्यक्‍ती कोण, याबाबत गतीने चौकशी सुरू केली जात आहे. राजाराम माने याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे  आढळून येत आहे. दबाव टाकणे, पैसे उकळणे, धमकी देणे असे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, वादग्रस्त सरवदे रजेवर असले तरी त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे समजते.
गुरुवारी तिसर्‍या दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावात पोलिसांची कुमक सतर्क ठेवण्यात आली होती. शिरोळ पोलिस ठाण्याच्या परिसराला पोलिस, जलद कृती दल, सीआरपीएफ कर्मचार्‍यांचा गराडा कायम आहे.  शिरोळमध्ये उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी संघटना, वडाप संघटना, हातगाडी चालक, छोटे टपरी व्यवसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. सकाळी मृत माने याचे रक्षाविसर्जन होत असताना संतप्त ग्रामस्थांनी प्रभारी डीवायएसपी सूरज गुरव (जयसिंगपूर), पोलिस निरीक्षक उदय डुबल यांना संशयित आरोपी शिंदे नामक व्यक्‍तीस का अटक केली नाही, असा जाब विचारला. यावेळी गुरव यांनी चौघांना अटक केली आहे व शिंदेचा तपास सुरू आहे, असे सांगितले. शिष्टमंडळाने शिरोळ पोलिस ठाण्यात  जिल्हा पोलिसप्रमुख मोहिते यांची भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली. यावेळी मोहिते यांनी फिर्यादीमधील संशयित आरोपी शिंदे याचाही शोध घेऊन कारवाईचे आश्‍वासन दिले.