होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचा पाया ‘कोयने’च्या धर्तीवर 

पर्यायी पुलाचा पाया ‘कोयने’च्या धर्तीवर 

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोयना धरण बांधताना पाया काढण्यासाठी वापरलेल्या तंत्राचा वापर करून शिवाजी पुलास बांधण्यात येणार्‍या पर्यायी पुलाचा पाया खोदण्यात आला. प्लम काँक्रीटचा वापर करून मातीयुक्‍त विहीर बुजविण्यात येत आहे. 

पर्यायी पुलाच्या उर्वरित पिलरसाठी पाया खोदाई करण्यात आली. मात्र, फाऊंडेशनपासून तब्बल चाळीस फूट खोल दगडाचा भाग लागला नाही. मातीयुक्‍त विहीर लागल्याने कोणत्या तंत्राने पाया मजबूत करावा, याचा शोध सुरू होता. कोयना धरण बांधताना अशीच स्थिती उद्भवल्याने तेथे वापरण्यात आलेल्या तंत्राचा अभ्यास करून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, उपअभियंता संपत आबदार यांनी प्लम काँक्रीट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

15 फूट बाय 15 फूट आकाराची तब्बल चाळीस फूट खोल विहीर बुजवून त्यावर फाऊंडेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी प्लम काँक्रीट टाकण्यास प्रारंभ केला. दुपारी पावसाने उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले. प्रथम 10 केव्ही मोटरच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसा करण्यात आले. दगडाचे सोलिंग  केल्यानंतर पाईपच्या सहाय्याने तयार काँक्रीट या विहिरीत ओतण्यात आले. काँक्रीट आणि दगड यांचे योग्य प्रमाणात मिश्रण होईल, याची दक्षता घेऊन सात गाड्या काँक्रीट ओतण्यात आले.

पावसास सुरुवात झाल्यानंतर काँक्रीट टाकणे बंद करावे लागले. शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्यास विहिरीतील पाणी उपसा करून पुन्हा काँक्रीट टाकण्यात येणार आहे. काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असले तरी डिझाईन सर्कलकडून डिझाईन मिळाल्यानंतर पुढील कामास गती मिळणार आहे.