Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Kolhapur › ...तोपर्यंत काँग्रेसपासून अलिप्त : प्रकाश आवाडे

...तोपर्यंत काँग्रेसपासून अलिप्त : प्रकाश आवाडे

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 12:43AMइचलकरंजी : वार्ताहर

जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व्हावी, यासाठी लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन पक्षाची सद्यस्थिती मांडणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. जिल्ह्यातील सुडाचे, पक्षापेक्षा व्यक्तिद्वेषाचे सुरू असलेले राजकारण थांबत नाही, तोपर्यंत आपला पक्षाशी संपर्क राहणार नाही, असा पुनरुच्चारही आवाडे यांनी यावेळी केला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आवाडे शनिवारी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीची पायरी चढले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आवाडे म्हणाले, काँग्रेस कमिटीत येण्यासाठी मला निमंत्रणाची गरज नाही. मी राजकीय संन्यासही घेतलेला नाही. मात्र, काही वर्षांत संघटनात्मक बदल आवश्यक असताना तसे जिल्हा काँग्रेसमध्ये घडलेच नाही. त्याचे परिणाम मनावर होत आहेत. 

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत पतंगराव कदम आदी नेत्यांचीही भेट घेऊन काँग्रेस पक्षातील विदारक स्थिती कशी आहे, याची माहिती त्यांना दिली होती. जिल्ह्यातील सुडाचे राजकारण, व्यक्तिद्वेष याविषयी कार्यकर्त्यांतही खदखद आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने लवकरच राहुल गांधी, मोहन प्रकाश यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. काँग्रेसच्या विदारक अवस्थेचे कथन त्यांच्यासमोर करणार असल्याचेही आवाडे यांनी यावेळी सांगितले. 

काँग्रेसमध्ये सन्मानजनक वागणूक मिळाली, तरच गतीने काम करणार असून, कोणाच्या मागे फरफटत जाण्याची आता गरज नाही. काहींनी वेड पांघरूण सोंग घेतले आहे. तेही आम्ही ओळखले असून, कोणाचाही कार्यक्रम करण्यासाठी वेळ लागत नाही. मात्र, काँग्रेसच्या विचारसरणीच्या माध्यमातून आमचा विचारांचा लढा सुरू आहे. मतभेद असल्याने अनेकवेळा डावलले गेले. त्यामुळे वेगळ्या वाटेने 
चाललो आहे. याची सर्वांनाच जाणीव आहे. 

अन्याय झाल्यामुळे पर्याय म्हणून ताराराणी आघाडी पक्षाचा ब्रँडही तयार आहे. मात्र, काँग्रेस भक्कम व्हावी, ही भूमिका आजही आहे. पक्षापेक्षा व्यक्तिद्वेष कमी होत नाही, तोपर्यंत कशाचीही तमा न बाळगता आता रडायचे नाही लढायचे, असा निर्धार कायम असल्याचे मत आवाडे यांनी व्यक्त केले. 

व्यक्तिदोषामुळे पक्षाची मोठी हानी

एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आम्ही मिरवायचो. मात्र, गेल्या अनेक वर्षांत जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध नाही. या दुर्दशेला प्रदेश, दिल्लीस्तरावरील व्यक्ती जबाबदार नसून, याला जिल्ह्यातीलच काहीजणांचा व्यक्तिदोष कारणीभूत आहे. त्यामुळे वाद दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत बाजूला राहण्याचा निर्णय कायम आहे.