Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Kolhapur › दहशत, दडपशाहीमुक्‍तीसाठी त्रिपुरात भाजपला सत्ता : भंडारी

दहशत, दडपशाहीमुक्‍तीसाठी त्रिपुरात भाजपला सत्ता : भंडारी

Published On: Mar 22 2018 12:38AM | Last Updated: Mar 22 2018 3:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कम्युनिस्टांच्या दहशत व दडपशाहीविरोधात झालेल्या वैचारिक परिवर्तनामुळे त्रिपुरात भाजपला सत्ता मिळाली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी केले. हिंदू व्यासपीठाच्या वतीने आयोजित के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ‘त्रिपुरा एक वैचारिक परिवर्तन’ या विषयावर ते बोलत होते. 

भंडारी म्हणाले, 1925 साली कम्युनिस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतातील  कम्युनिस्ट पक्षाची स्थापना रशियातील ताश्कंद शहरात झाली, तर आरएसएसची नागपूरमध्ये झाली.दोन्ही पक्षांचा समांतर राजकीय प्रवास सुरू आहे. 1952 साली काँग्रेस पक्षानंतर सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष हा कम्युनिस्ट पक्ष होता; पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांचे योगदान काहीच नव्हते. भारत देश स्वातंत्र्य मिळवण्याच्या पात्रतेचा नाही, असे लेनिन म्हणत होता. त्या लेनिनचा पुतळा त्रिपुरात जनतेने पाडला.

या घटनेचे भाजप समर्थन करत नाही; पण अनेक वर्षे येथील जनता कम्युनिस्टांच्या   दडपशाहीखाली राहत होती. त्यातून मिळालेल्या मुक्‍तीचा तो उद्रेक होता. त्रिपुरात राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे भाजप सरकारने काढले. नक्षलवाद्यांनी ठराविक भागात आपली दहशत कायम ठेवली आहे. येथील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, तसेच आधुनिक सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम ते करत आहेत.  गेल्या चार वर्षांत त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. 

ते म्हणाले, आज भाजप सरकार अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करत आहे.  हल्‍ली सत्तेत नसणारे आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी खोटा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दलित तरुणांना कम्युनिस्ट बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पाठिंबा देणारे बेजबाबदार नेते वास्तव लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत; पण जनता सुज्ञ आहे. ती भाजपच्या विचारधारेशी एकरूप झाली आहे. त्यामुळे एकाच वर्षात स्थापन झालेला कम्युनिस्ट पक्ष कुठे आहे व पूर्वीचा जनसंघ व आताचा भाजप कुठे आहे, हे स्पष्ट होत आहे.यावेळी सुभाष वोरा, बाबा देसाई,भगत रामजी छाबडा, सूर्यकिरण वाघ, उदय सांगवडेकर उपस्थित होते. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, terrorism free tripura, peoples give mandate, BJP , state election, Madhav Bhandari