Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी सभा तहकूब

मराठा आरक्षणासाठी सभा तहकूब

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 11 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘एक मराठा..लाख मराठा’च्या घोषणा देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. यावेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘जय भवानी..जय शिवाजी’च्या दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचे सभागृह आज दणाणून गेले. सभा तहकूब करण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक होत्या. सभा तहकूब झाल्यानंतर सदस्यांनी दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जात आंदोलनात भागीदारी केली.

मराठा समाजाच्या आरक्षणाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी लाखाचे मोर्चे काढण्यात आले. तेदेखील शांततेत. तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक  स्वराज्य संस्थांमधूनही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटू लागले आहेत. आजची जि.प.ची सर्वसाधारण सभा तहकूब झाली. सभेच्या सुरुवातीला सतीश पाटील यांनी, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. कोल्हापुरातही गेल्या सतरा दिवसांपासून दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आजची सभा तहकूब करण्याचा ठराव करावा, अशी मागणी केली. विजय भोजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तरुणांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणांना तसेच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करू त्यानंतर सभा तहकूब करण्याचा ठराव मांडू, असे सांगितले. त्यानुसार श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री. भोजे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजची सभा तहकूब करण्याचा ठराव मांडला. त्याला अरुण इंगवले यांनी त्याला अनुमोदन दिले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे. हा अहवाल लवकर सादर व्हावा याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आजची सभा तहकूब करण्याच्या मांडलेल्या ठरावास मी अनुुमोदन देत आहे.

राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, मराठा आरक्षणासाठी काल पुकारलेला बंद यशस्वी केल्याबद्दल ग्रामीण भागातील जनतेच्या अभिनंदनाचा ठराव करावा. भगवान पाटील, प्रसाद खोबरे यांनीही चर्चेत भाग घेतला. यानंतर सभा तहकूब करत असल्याचे अध्यक्ष सौ. महाडिक यांनी सांगितले. अध्यक्षांनी सभा तहकूब करताच पुन्हा एकदा सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सदस्य मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनान सहभागी होण्यासाठी गेेले. 

राधानगरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकणार्‍या कु. गायत्री सुरेश शिंदे या मुलीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन व गायत्रीचा सत्कार आजच्या सभेत करण्यात आला होता; मात्र सभा तहकूब झाल्याने तिचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरिष घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे, मुलीचे वडील सुरेश शिंदे, आई अन्नपूर्णा शिंदे, रावसाहेब भालकर आदी उपस्थित होते.