Sun, Oct 20, 2019 01:57होमपेज › Kolhapur › थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्‍तदान शिबिर कौतुकास्पद उपक्रम : ठाकरे

थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्‍तदान शिबिर कौतुकास्पद उपक्रम : ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रक्‍तदान शिबिर होत असतात; पण या रक्‍ताचा उपयोग थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी करणे हा शिवसेना शहर कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद‍्गार शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी काढले. यावेळी थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांनी ठाकरे यांची  भेट घेतली. 

या उपक्रमांची माहिती उद्धव ठाकरे यांना देताना दुर्गेश लिंग्रस म्हणाले,  शिवसेना शहर कार्यालय व राजारामपुरी ‘गोज ग्रीन’ यांच्या वतीने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी गेल्या 12 वर्षांपासून रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले जाते. थॅलेसेमिया हा जनुकीय गुणसूत्रांमुळे होणारा आजार आहे. या आजारातील रुग्णांच्या शरीरातील रक्‍ताच्या लाल पेशींची निर्मिती होणे बंद होते. अशा रुग्णांना सुरुवातीपासून बाहेरील व्यक्‍तीचे रक्‍त देणे गरजेचे बनते. सुरुवातीला महिन्यातून एकदा रक्‍त द्यावे लागते. पण वाढत्या वयाबरोबर रक्‍ताची गरज वाढत जाते. अनेकवेळा योग्य गटाचे रक्‍त मिळत नाही. म्हणून ‘गोज ग्रीन’ च्या वतीने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्‍त दिले जाते. आजपर्यंतच्या रक्‍तदान शिबिरातून सहा हजारांहून अधिक रक्‍त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. एक हजार थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना हे रक्‍त देण्यात आले आहे.  थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे आयुष्य 20 ते 22 वर्षांचे असते. किमान या काळापुरते तरी त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले. 

या रुग्णांची जबाबदारी घेतली आहे तर त्यांची काळजीही घ्या,  असे सांगत ठाकरे यांनी रुग्णांची विचारपूस केली. यावेळी खासदार गजानन किर्तीकर यांनीही थॅलेसेमिया रुग्णांसाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, राजारामपुरी येथे आयोजित रक्‍तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 800 हून अधिक रक्‍त पिशव्या संकलित करण्यात आल्या. यावेळी मंगेश लिंग्रस, विराज पाटील, श्री आयरेकर, फारूक मुल्‍ला, महेश उत्तुरे व शिवसैनिक उपस्थित होते.