होमपेज › Kolhapur › टी.बी. रुग्णांना पोषणासाठी दरमहा 500 रुपये

टी.बी. रुग्णांना पोषणासाठी दरमहा 500 रुपये

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

टी.बी.मुक्‍त कोल्हापूरसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून त्याअंतर्गत संसर्गित रुग्णांना पोषणासाठी म्हणून दरमहा 500 रुपये सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत. येत्या एप्रिलपासून ही योजना सुरू होत आहे, अशी माहिती जि.प. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. याशिवाय टी.बी. रुग्ण कळवा आणि कमिशन मिळवा, असा उपक्रम घेण्यात आला असून खासगी डॉक्टर, औषध दुकाने यांना यात सहभाग घेता येणार आहे, असेही डॉ. खेमनार यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 19 मार्चपासून 28 मार्चपर्यंत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीची माहिती जि.प. मध्ये आयोजित बैठकीनंतर डॉ. खेमनार यांनी पत्रकार बैठकीत दिली. जिल्हा क्षयरोग व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. खेमनार म्हणाले, टी.बी. आटोक्यात येण्यासाठी रोगप्रतिकार शक्‍ती चांगली असणे गरजेचे आहे. त्याचसाठी जिल्ह्यातील टी.बी. संसर्गित रुग्णांना चांगल्या आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना मोफत औषध व उपचाराशिवाय फक्‍त आहारासाठी 500 रुपये अनुदान दरमहा दिले जाणार आहे. सहा महिने अशाप्रकारे हे अनुदान दिले जाणार असून ते थेट संंबंधित रुग्णाच्या खात्यावरच जमा केले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 16 हजार 325 टी.बी.रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना याचा लाभ होणार आहे. 

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी टी.बी. रुग्ण व उपचारासंबंधीचा आढावा घेतला. सरकारी दवाखान्यात टी.बी.चे सर्व उपचार मोफत होतात. आता खासगी दवाखान्यात येणार्‍या रुग्णांचाही सर्व खर्च आरोग्य विभागामार्फतच केला जात आहे. शिवाय, रुग्ण शोधून दिल्याबद्दल खासगी डॉक्टरांना कमिशनही दिले जात आहे. याची व्याप्‍ती आणखी वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दर दोन महिन्यांनी टी.बी. रुग्ण शोधमोहीम

इचलकरंजी आणि शाहूवाडी या तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर टी.बी. रुग्ण शोधमोहीम राबवल्यानंतर आता त्याची व्याप्‍ती वाढवून दर दोन महिन्यांनी सर्वच तालुक्यांत अशाप्रकारे घर टू घर शोधमोहीम राबवली जाणार आहे. रुग्ण शोधण्यापासून ते त्याला उपचार व पूर्ण बरा होईपर्यंतचा सर्व फॉलोअप जि.प. व सी.पी.आर.चा क्षयरोग विभागाकडून घेतला जाणार आहे. 

टी.बी. बरा होण्याचे जिल्ह्याचे 55 टक्के प्रमाण

टी.बी. हा दुर्धर असला तरी योग्य व सातत्यपूर्ण औषधोपचाराने तो बरा होणारा आजार आहे. रुग्ण बरा होण्याचे राज्याचे प्रमाण 45 टक्के असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक 55 टक्के इतके आहे. वेळेत उपचार न झाल्याने टी.बी.मुळे मृत्यू पावणार्‍यांचे जिल्ह्याचे प्रमाण 7 टक्के इतके आहे. 2016 मधील एकूण 1216 बाधीत रुग्णांपैकी 83 जणांना जीव गमवावा लागला होता. हे मृत्यूचे प्रमाण कमी  होण्यासाठी वेळेत उपचार व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करत आहे. त्याला नागरिकांनीही तितकेच सहकार्य करण्याची गरज आहे.