Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Kolhapur › ‘बालगोपाल’चा मंगळवार पेठ संघावर एकतर्फी विजय

‘बालगोपाल’चा मंगळवार पेठ संघावर एकतर्फी विजय

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:01AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

मंगळवार पेठ फुटबॉल संघावर 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळवत बालगोपाल तालीम मंडळाने साखळी फेरीत आघाडी मिळविली. ‘सामनावीर’ म्हणून रोहित कुरणे (बालगोपाल) याला गौरविण्यात आले. दरम्यान, 17 वर्षांखालील उपांत्य सामन्यात गडहिंग्लज युनायटेडने कोल्हापूर पोलिस संघावर मात करून अंतिम फेरीत मुसंडी मारली. विजयी गोलची नोंद गडहिंग्लजच्या भुपेंद्र पोवार याने केली. 

सॉकर अ‍ॅमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) आयोजित ‘चंद्रकांत’ चषक महासंग्राम स्पर्धेतील साखळी फेरी रंगतदार सामन्यांनी गाजत आहे. गुरुवारी बालगोपाल तालीम विरुद्ध मंगळवार पेठ यांच्यात सामना रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच बालगोपालने वर्चस्व राखले. आक्रमक चढायांसह आघाडीसाठी प्रयत्न केले. मंगळवार पेठेची चिवट झुंज व्यर्थ ठरवत 17 व्या मिनिटाला त्यांच्या रोहित कुरणे याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. 

उत्तरार्धातही बालगोपालचा आक्रमक पवित्रा कायम होता. जलद खेळी करत त्यांनी आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. 44 व्या मिनिटाला झालेली चढाईवेळी मंगळवार पेठेच्या गोलक्षेत्रात हँडबॉल झाल्याने मुख्य पंचांनी पेनल्टीचा इशारा दिला. यावर प्रतीक पोवारने गोल नोंदवत आघाडी मिळविली. 70 व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने तिसरा गोल केला. पाठोपाठ 72 व्या मिनिटाला ऋतुराजने वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथा गोल केला. बालगोपालच्या सुमित घाटगे, दिग्विजय वाडेकर, चिक्यू इबीरे, अक्षय कुरणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. मंगळवार पेठेच्या सोमनाथ पोवार, नीलेश खापरे, शिवम पोवार यांनी गोल फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले. 

आजचा सामने : वरिष्ठ गट : पाटाकडील तालीम विरुद्ध बालगोपाल, सायंकाळी 4 वाजता. 
17 वयोगट : शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील, रात्री 7 वाजता.