Thu, Jul 18, 2019 12:31होमपेज › Kolhapur › अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे भोजन चाखण्यास नकार?

व्हीआयपी व्यक्तींचे भोजन चाखण्यास नकार?

Published On: May 20 2018 11:00AM | Last Updated: May 20 2018 11:00AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात शासकीय दौर्‍यावर आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भोजन व्यवस्थेमध्ये काही घातपात होऊ नये, याकरिता संबंधित भोजनाची चाचणी घेण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीला आता आव्हान दिले गेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यावसायिकांच्या अखिल भारतीय शिखर संघटनेनेच याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी अशाप्रकारे सुरू असलेली व्यवस्था बंद करण्याची मागणी केली असून, शासन स्तरावर तातडीने उचित निर्णय न झाल्यास या पद्धतीत वैद्यकीय अधिकारी असहकार पुकारतील, असा इशारा देण्यात आला आहे. 

भारतामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान वा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांचे दौरे निश्‍चित झाले, की या दौर्‍यात त्यांची काळजी घेण्यासाठी एक सरकारी यंत्रणा कामाला लागते. या यंत्रणेमार्फत ज्या ठिकाणी दौरा आहे, अशा ठिकाणच्या प्रशासनाला एक यादीच पाठविली जाण्याची पद्धत आहे. यामध्ये पुरेशा सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा करणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा रक्तगट असलेल्या किमान दोन व्यक्ती अथवा दोन बाटल्या रक्त उपलब्ध करणे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक तैनात करणे आदी गोष्टींचा समावेश असतो. यातील प्रोटोकॉलमध्ये सहभागी होणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर व्हीआयपी व्यक्तींना देण्यात येणार्‍या भोजनाची तपासणी करण्याची जबाबदारी असते.

 संबंधितांनी हे भोजन घेतल्यानंतर एक तासाच्या कालावधीनंतर हे जेवण व्हीआयपींना देण्याची पद्धत आहे. जेणेकरून एक तासाच्या कालावधीत वैद्यकीय अधिकार्‍यांवर या जेवणाचा होणारा प्रतिकूल परिणाम तपासता येतो. आता याच पद्धतीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आव्हान दिले असून, त्यांनी पद्धत बंद करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

डॉक्टरांच्या गिनिपिगसारख्या वापरावर आक्षेप असोसिएशनच्या म्हणण्यानुसार व्हीआयपींचे जेवण डॉक्टरांना खाण्यासाठी देऊन त्याचे परिणाम तपासणे म्हणजे डॉक्टरांचा गिनिपिगसारखा वापर केल्यासारखे आहे. त्यांनी अशा वापराला कडाडून विरोध केला असून, अशी पद्धत अवलंबिण्याऐवजी संबंधित भोजनातील विषबाधा झाली आहे का, हे तपासण्याकरिता शास्त्रीय पद्धतीचा आधार घ्यावा, अशी सूचना केली आहे. सध्या उत्तर भारतात हे प्रकरण तापले असून, त्याचे लोण दक्षिणेकडे सरकण्यास वेळ लागणार नाही, असे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे.