होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ फुटबॉलपटूंच्या खिलाडूवृत्तीचा कित्ता गिरवा

ज्येष्ठ फुटबॉलपटूंच्या खिलाडूवृत्तीचा कित्ता गिरवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

लोककल्याणकारी राजाश्रय आणि भक्‍कम लोकाश्रय लाभलेल्या क्रीडानगरी कोल्हापूरची शतकी फुटबॉल परंपरा जपण्यासाठी नव्या खेळाडूंनी ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा खिलाडूवृत्तीचा कित्ता गिरवणे गरजेचे आहे, असे आवाहन बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रांगड्या फुटबॉल खेळाचे मैदान गाजविणार्‍या ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा विशेष सन्मान मंगळवारी बालगोपाल तालीम मंडळासमोर करण्यात आला. मानाचा कोल्हापुरी फेटा, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि पेहरावा असे सत्काराचे स्वरूप होते.   

कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाच्या चौफेर विकासासाठी  व खेळाडूंना लाखो रुपयांचे भक्‍कम पाठबळ देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्यानिमित्ताने या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, विजय खाडे, निवासराव साळोखे, बाळासाहेब बुरटे, रावसाहेब सरनाईक, उद्योजक चंद्रकांत जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, अशोक देसाई, अनिल पाटील, सुरेश जरग यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संदीप देसाई यांनी तर सूत्रसंचालन तुषारदेसाई यांनी केले. संयोजन ‘केएसडीआय’चे अध्यक्ष सुजय पित्रे, हेमंत अराध्ये, हेमंत कांदेकर, राजेंद्र राऊत, प्रदीप साळोखे, दिग्विजय मळगे, राजू साठे, अमित शिंत्रे, शेखर वळिवडेकर, विवेक वोरा, दीपक सुतार, देवरथ पवार, आदींनी केले.   

पंचांचा निर्णय शिरसावंध

आज कोल्हापुरात एकट्या फुटबॉल खेळावर प्रत्येक वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. खेळाडूंना कीट, बूटसह विविध आवश्यक वस्तू घरपोच मिळत आहेत. मात्र, याचा फायदा घेऊन मैदान गाजवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणारे सुख-समाधान मिळत नसल्याची खंत निवासराव साळोखे यांनी व्यक्‍त केली. खेळाडूंपासून ते समर्थकांपर्यंत खिलाडूवृत्तीपेक्षा टोकाची ईर्षाच अधिक दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ज्येष्ठ खेळाडूंचा आदर्श घेऊन पंचांचा निर्णय अंतिम माना, असे आवाहन साळोखे यांनी केले. 

आज दिमाखदार उद्घाटन सोहळा

दरम्यान, ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेतील सामने गुरुवारपासून सुरू होणार असले तरी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता, छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी 4 वाजता, कोल्हापुरात क्रीडा परंपरेचा भक्‍कम पाया निर्माण करणार्‍या लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि रांगडा फुटबॉल खेळ रुजवून तो विकसित करणार्‍या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक दसरा चौक व व्हीनस कॉर्नर येथील स्मारकांजवळ स्पर्धेत सहभागी 17 संघांच्या नावाने गुढ्या उभारण्यात येणार आहेत. येथून मोटारसायकल रॅलीने सर्वजण मैदानावर येणार असून शहरातील सर्व तालीम संस्थांच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांकडून ‘किक ऑफ’ने स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Tags : 


  •