होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीची भुरळ

कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीची भुरळ

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:19PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरची रांगडी भाषा, संस्कृती, विविध प्रकारची खाद्य संस्कृती, इथल्या लोकांच्या मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, इथले निसर्गसौंदर्य, प्राचीन इतिहासाच्या भव्यदिव्य पाऊलखुणा, इथली पुरोगामी विचारसरणी, प्रत्येक क्षेत्रात असलेले भयमुक्त वातावरण, इथल्या लोकांची उद्यमशिलता, जागतिक किर्तीची शैक्षणिक आणि कुस्ती परंपरा या सगळ्यांचीच आपल्या मनाला भूरळ पडली, अशा भावना पश्‍चिम क्षेत्रीय भाषा केंद्राच्या परप्रांतीय विद्यार्थ्यांनी कोल्हापूर भेटीप्रसंगी व्यक्त केल्या.

देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांचा अन्य प्रांतांमध्येही अभ्यास आणि विकास व्हावा, या हेतूने केंद्र शासनाने देशात म्हैसूर, भुवनेश्‍वर, पटीयाला, पुणे, सोलन, लखनौ आणि गुवाहटी या सात ठिकाणी क्षेत्रीय भाषा विकास केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या प्रदेशालगतच्या प्रादेशिक भाषा आणि संस्कृती याबाबतचे शिक्षण देण्यात येते. नुसते शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांना त्या त्या प्रादेशिक संस्कृतीचा जवळून अभ्यास होण्यासाठी प्रादेशिक दौर्‍यांचेही आयोजन करण्यात येते. पुणे क्षेत्रीय भाषा केंद्रात महाराष्ट्रीयन भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करीत असलेल्या अशा परप्रांतीय विद्यार्थ्यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट दिली. यावेळी या केंद्राच्या शिक्षिका सुजाता भुजंग, विद्यार्थी सत्यप्रकाशसिंग, अंबराय चक्रपाणी वगैरे उपस्थित होते.

या पथकाने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, काही तालमी, पन्हाळा किल्ला, जोतिबा देवालय, शिवाजी विद्यापीठ, कणेरी मठ आदी भागांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागांत जाऊन तिथल्या संस्कृतीची आणि भाषेचीही माहिती करून घेतली. या भेटीबाबत बोलताना केंद्राचे विद्यार्थी सत्यप्रकाश व अंराय म्हणाले, इथले वातावरण भयमुक्त वाटते, प्रामुख्याने महिलांना मिळत असलेले बरोबरीचे स्थान सुखावह आहे. आमच्या बिहारपेक्षा हा भाग औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक बाबतीत कितीतरी पुढारलेला दिसतो. खरोखरच इथल्या रांगड्या संस्कृतीची इतकी भूरळ पडली आहे की भविष्यात संधी मिळाली तर इथेच स्थायिक व्हायला नक्कीच आवडेल.