होमपेज › Kolhapur › नवनिर्मितीस कोल्हापुरातूनच चालना

नवनिर्मितीस कोल्हापुरातूनच चालना

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:18AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापुरात नवनिर्मितीस चालना मिळत आहे. प्रत्येक गोष्टीची नवीन सुरुवात कोल्हापुरात प्रथम करायची याचा पायंडा सुरू झाला असून, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद‍्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. 

पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पा (केएसबीपी) तर्फे आयोजित  फ्लॉवर फेस्टिव्हलच्या समारोप समारंभात ते बोलत होते. गेले पाच दिवस सुरू असलेल्या फेस्टिव्हलमध्ये नागरिकांची तोबा गर्दी झाली. सौ. अंजली चंद्रकांत पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, आ. अमल महाडिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी या फेस्टिव्हलची सांगता झाली. 
पालकमंत्री पाटील म्हणाले, अंबाबाईला येणारा भाविक आणखी चार दिवस कोल्हापुरात रेंगाळला पाहिजे, या भावनेतून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याद‍ृष्टीने पर्यटनस्थळे वाढविण्यावर भर दिला जात आहे.

फ्लॉवर फेस्टिव्हलच्या माध्यमातूनही हा उद्देश साध्य झाला आहे. 303 फूट उंचीचा तिरंगा असो अथवा राज्यात प्रथम सुरू झालेला फ्लॉवर फेस्टिव्हल असो, अशा नव्या संकल्पनांची सुरुवात कोल्हापुरात होत आहे. प्रत्येकाने आपल्यास सुचलेली कल्पना व्यवहारात आणावी. त्यासाठी शासन निधीची कमरतता कमी पडू देणार नाही. मुंबईत  हॉटेल विकसित केले आहे. त्या धर्तीवर रंकाळा तलावात नव्याने काही करता येते का, याचा विचार सुरू आहे. नवीन वर्षात कोल्हापूर महोत्सव भरविण्यात येणार आहे. मारवाडी, सिंधी, गुजराती, मराठी अशा प्रत्येक घटकासाठी कार्यक्रम अशी संकल्पना आहे. एप्रिल ते मे या कालावधीत ‘मोफत कोल्हापूर टूर’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. दर दोन दिवसांनी 15 ते 16 टूर्स काढल्या जातील. यामध्ये जिल्ह्यातील न पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येतील. सर्वांना ही टूर मोफत असेल; मात्र आगाऊ नोंदणीचे बंधनकारक आहे. एक एप्रिलपासून नोंदणी सुरू केली जाणार असून, 15 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. 

सुजय पित्रे यांनी केएसबीपीतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. फेस्टिव्हलमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विनायक भोसले, सुजय पित्रे यांचा सत्कार करण्यात आला. मधुरा बाटे हिच्या शिववंदन या नृत्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी ‘फुलोत्सव’ या विशेष अंकाचे ना. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कलाकारांनी फेस्टिव्हलवर आधारित नृत्याविष्कार सादर केला. तर, फेस्टिव्हलमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांवर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.