Fri, Apr 26, 2019 03:27होमपेज › Kolhapur › कोल्हापूर महापूरसद‍ृश स्थिती

कोल्हापूर महापूरसद‍ृश स्थिती

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:19AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

जिल्ह्यात संततधार पावसाने मंगळवारीही हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडीप दिली. मात्र, नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. वडणगे-कोल्हापूर मार्ग पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. राधानगरी 91 टक्के तर काळम्मावाडी धरण 80 टक्के भरले आहे. गडहिंग्लजमधील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, राज्य मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भुदरगड तालुक्यातही पूरस्थिती असून, कोल्हापूर-गारगोटी मार्ग बंद झाला आहे. तालुक्यात 17 घरांची पडझड झाली आहे.

वडणगे-कोल्हापूर मार्ग पाण्याखाली

वडणगे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सोमवारी रात्री वडणगे-कोल्हापूर (पोवार पाणंद) मार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वडणगे, निगवे दुमाला भुयेवाडी, भुये, जठारवाडी येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. 

पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांपर्यंत पोहोचली की नदी धोक्याची पातळी ओलांडते. पाण्याची पातळी शिवाजी पुलाच्या पिलरवर कोरलेल्या माशाच्या चित्रापर्यंत पोहोचली की, मच्छिंद्री झाली असे म्हणतात. याचवेळी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर आंबेवाडीनजीक रस्त्यावर पाणी आल्यानंतर रेडेडोह फुटला, असे म्हणतात. नदीची पातळी 43 फुटांवर पोहोचल्यानंतरच या दोन्ही गोष्टी घडतात. यानंतर खर्‍या अर्थाने महापूर येतो. प्रत्येक पावसाळ्यात आंबेवाडीजवळील या रेडेडोहाची चर्चा होते. रेडेडोह म्हणजे एक मृत्यूचा सापळा असल्याचीही चर्चा नेहमी होत असते. कारण, आजपर्यंत महापूर आल्यानंतर रेडेडोहापासून पाण्यातून चालत जाण्याचे साहस करताना अनेकजण पुरातून वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पुराचे पाणी पाहायला गेलेला वडणगे येथील एक तरुण रेडेडोहातून वाहून गेला. गतवर्षी एक बीएमडब्ल्यू कार वाहून गेली होती. सुदैवाने या कारमधील दोघेजण बचावले होते.पावसाळ्या व्यतिरिक्त एरव्हीसुद्धा या मार्गावर अपघातांची मालिका सतत सुरू असते. यातील बहुतांश अपघात हे आंबेवाडीनजीक असलेल्या रेडेडोहाजवळच घडले आहेत.

कळे-मरळीदरम्यान पुराचे पाणी

कळे    :  कोल्हापूर व गगनबावडा मार्गावरील कळे- मरळीदरम्यान सोमवारी (ता. 16) रात्री पुराचे पाणी आल्याने येथील वाहतूक पोलिसांनी बदं केली. धामणी खोर्‍यामध्ये वाघुर्डे व गोगवे (ता. पन्हाळा) येथे पुराचे पाणी आल्याने धामणी खोर्‍याला बेटाचे स्वरूप आले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कळे-मरळीदरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत सुमारे दीड ते दोन फूट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक  बंद केली. कोल्हापूरला होणारी वाहतूक पुनाळ-यवलूज-खुपिरेमार्गे वळविण्यात आली. वाघुर्डे येथील ओढ्यावर पुराचे पाणी आले. गोगवे येथे पुराचे पाणी आल्याने या रस्त्यावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाघुर्डेसह सुळे, कोदवडे, गोगवे, वेतवडे, पणोरे, बळपवाडी  हरपवडे,  आकुर्डे, गोठे, तांदूळवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.

‘राधानगरी‘ 91 टक्के भरले

पाच-सहा दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी राधानगरी तालुक्यात काही अंशी पावसाचे प्रमाण घटले. भोगावती नदीला महापूर आल्यामुळे नदीकाठची पिके धोक्यात आली आहेत. भोगावती काठावरील वहातुक विस्कळीतच असून राधानगरी धरण 91 टक्के तर काळम्मावाडी धरण 78 टक्के भरले आहे. तुळशी धरणात 85 टक्के पाणी साठा झाला आहे. भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

तालुक्याला गेले पाच दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज काही प्रमाणात पावसाची उघडझाप होती. मात्र काहीशी विश्रांती घेऊन पुन्हा झोडपून काढत होता. त्यामुळे तिन्ही धरण क्षेत्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरनात 7.62 टीएमसी पाणीसाठा झाला असून हे प्रमाण 91 टक्के एवढे आहे. या धरणातून प्रतिसेकंद 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे धरण गुरुवारी अथवा शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा अंदाज आहे.  काळम्मावाडी धरण क्षेत्रात आज अखेर 2011 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


काळम्मावाडी धरण 80 टक्के

दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागरात 79.72 टक्के पाणीसाठा झाला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून  बुधवारी धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठा सांडवा पातळीपर्यंत 641.52 मीटर पूर्ण झाला आहे. त्यामुळे आज कोणत्याही क्षणी दूधगंगा नदी पात्रात विसर्ग होणार आहे. आज धरण परिसरात एकूण पाऊस 2049 मी. मीटर झाला असून जलाशयाची पातळी 641.52 मीटर असून पाणीसाठा 573,293 दलघमी म्हणजे (20.24 टीएमटी) 79.72 टक्के इतका आहे. गतसाली आज तारखेला धरण परिसरात 1165 मीटर पाऊस झाला होता. त्यावेळी जलशयाची पातळी 633.38 मीटर तर पाणीसाठा 351.379 दलघमी म्हणजे (12.40 टीएमसी) 48.86 इतका होता. चालू वर्षे 7.84 टी एम.सी पाणी साठा आज तारखेला अधिक आहे. धरण परिसरात धुवाँधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे  बुधवारी कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.