Thu, Apr 25, 2019 22:06होमपेज › Kolhapur › महापुराची कारणे शोधण्याची गरज

महापुराची कारणे शोधण्याची गरज

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:35AMनृसिंहवाडी : विनोद पुजारी

कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या बॅकवाटरमुळे (फुगीमुळे) महापूर येतो व त्याचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना बसतो. याबाबत समज-गैरसमज वाढत चालले आहेत. 2005 साली हे धरण कार्यान्वित झाले व त्याचवेळी महापुराचा फटका या दोन जिल्ह्यांना बसला. त्यामुळे या समजाला एक प्रकारचे बळ प्राप्‍त झाले. प्रत्येक वर्षी पावसाळा आला की महापुराची भीती ग्रामस्थांना वाटते. त्यामुळे महापुराची कारणे शोधण्याची गरज आहे.

अलमट्टी धरणाला आमच्या प्रतिनिधीने आज भेट दिली व या धरण स्थळावरून जी माहिती मिळवली त्यानुसार हे विशाल धरण कृष्णा नदीवर 13 वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून धरणाची भिंत विजापूर हद्दीत आहे. भिंतीची लांबी 1565 मीटर आहे तर उंची 524 मीटर इतकी आहे. उत्तर कर्नाटकात हा भाग येतो. धरणाला 24 गाळे आहेत. हे धरण कोयनेपेक्षा मोठे आहे. अधिकृत माहितीनुसार 524 मीटर उंचीवर पाणीसाठा केल्यास 200 टीएमसी पाणीसाठा होतो तर 519 मीटर उंचीला 123 टीएमसी पाणी साठते. 

सध्या 518 मीटर उंचीनुसार 121 टीएमसी पाणी साठा धरणात आहे. त्यामुळे साधा छोटा पूर कोल्हापूर भागातील काही तालुक्यातील दिसून येतो.  विशेषत: कृष्णा काठच्या गावात याची तीव्रता जाणवते. अलमट्टी धरणाचा फायदा प्रचंड प्रमाणात कर्नाटकाला झाला आहे. शेती, वीज कारखाने या द‍ृष्टीने विजापूर, बागलकोट हा भाग भक्‍कम बनला आहे. 

या धरणाच्या फायद्याबरोबर तोट्याचाही विचार कर्नाटक शासनाने केला. धरणानजीकची 20 गावे 518 मी. उंचीला स्थलांतरित करावी लागली. 521 मी. उंचीला लवादाकडून या शासनाला मान्यता मिळाली; परंतु या धरणावर भारत सरकारच्या जल विभागाचे नियंत्रण असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक शासन यांचा सर्व द‍ृष्टीने समन्वय करणे भाग पाडण्यात आले आहे. त्यामुळे 519 मीटरच्या पुढे उंचीवर पाणीसाठा करण्यास सध्या बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या धरणातून ओव्हर फ्लो पाण्याचे विसर्ग होत आहे. 

या धरणाचे वरिष्ठ अधिकारी मंजुनाथन यांची भेट घेतली असता ते म्हणाले, सध्या आम्ही 1 लाख 65 हजार क्युसेक इतका विसर्ग ठेवला आहे. धरणाच्या 521 मीटर उंची साठ्यास परवानगी आहे. आम्ही 524 मीटर उंचीच्या साठ्यास परवानगी मिळावी, असा प्रयत्न करीत आहोत. 

एकूण 518 मीटर उंची साठ्यावर छोटा पूर येतो. 521 मी. उंची साठ्यास महापुराचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  बॅक वॉटरची फूग कोणत्या धरणामुळे किती येते, अलमट्टीच्या उंचीचा साठा किती असावा, धरण विसर्गात नियमितता कशी असावी याबाबत केंद्र, महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांनी दक्ष राहून उपाययोजना करण्याची गरज आहे. या प्रश्‍नाकडे सर्वच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी डोळे सतत उघडे ठेवून पाहणे आवश्यक आहे.

दत्त मंदिरातील पाणी हळूहळू कमी होण्याचे कारण काय

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य दत्तमंदिर गेले 13 दिवस पाण्यात आहे. पावसाची उघडीप मिळूनही पाणी उतरत नाही. बॅक वाटर फुगीचा हा परिणाम आहे, अशी चर्चा शिरोळ तालुका व परिसरातून होताना दिसून येत आहे.