Mon, Apr 22, 2019 06:17होमपेज › Kolhapur › शहर, जिल्ह्यात बरसला पहिला वळीव

शहर, जिल्ह्यात बरसला पहिला वळीव

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात यंदाच्या उन्हाळ्यात पहिला वळीव पाऊस बरसला. दुपारी दोन वाजल्यापासून अचानकच आकाशात ढग जमू लागले आणि साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास तासभर पाऊस पडला. पावसामुळे तारा तुटण्याच्या किंवा ट्रान्स्फॉर्मर जळण्याच्या भीतीने महावितरणने शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित केला होता. दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेक भागात वीज नव्हती. तर काही भाग रात्री उशिरापर्यंत अंधारातच होता.

गुढीपाडव्यादिवशीच पावसाने सुरुवात केल्याने यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज शेतकरी वर्तवित आहेत. पाडवा खरेदीसाठी अनेक कुटुंबे दुचाकीवरून शहरात खरेदीसाठी फिरत असतानाच सुरू झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. 

महाद्वार रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील व्यापार्‍यांनी पाडव्यानिमित्त दुकानाबाहेर माल मांडला होता. अनेक व्यापार्‍यांनी मांडव घालून विक्रीसाठी माल ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे हा माल दुकानात घेताना व्यापार्‍यांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व अन्य वस्तू भिजल्याने व्यापार्‍यांची धावपळ उडाली.

पहिल्या वळिवाच्या पावसातच अनेक ठिकाणी पाणी साचले. सुमारे तासभर पाऊस पडला तरी त्यात जोर नव्हता. ज्या ठिकाणी तेल अथवा इतर पदार्थ सांडलेले होते, अशा ठिकाणी वाहने घसरू लागल्याने तेथून चालकांना सावधपणे जावे लागत होते. 
शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात केवळ ढगांनी गर्दी केली; पण पाऊस पडला नाही. गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यातील काही भागात पाऊस पडला. हा पाऊस ऊस आणि खरिपाच्या हंगामाची मशागत करण्यासाठी उपयुक्‍त असला तरी रब्बी हंगामातील गहू व इतर पिकांच्या मळणीवर विपरीत परिणाम होणार आहे. आंबा आणि काजूला काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, असे कृषी अधिकार्‍यांचे मत आहे.

पावसनाने शहरातील विद्युत पुरवठा खंडित

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरनोबतवाडी येथील विद्युत वाहिनीवर सायंकाळी पाचच्या सुमारास झाड पडल्याने शहरातील पूर्व भागातील अनेक परिसरात आणि नागाळा पार्क वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने उर्वरित शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचार्‍यांनी तातडीने झाड बाजूला करून बिघाड दुरुस्त केल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला.

सरनोबतवाडीजवळ झाड पडल्याने शाहू मिल, जीपीआय, शिवाजी विद्यापीठ या 33 केव्ही वीज उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे राजारामपुरी, टाकाळा शाहू मिल कॉलनी, विद्यापीठ परिसरासह शहराच्या पूर्व भागातील अनेक परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. सुमारे तास ते दीड तास अनेक भागात वीज गायब होती. विद्युत वाहिनीवर पडलेले झाड मोठे असल्याने झाड हलविण्यास विलंब झाला. पोकलॅनच्या सहाय्याने झाड हटवून विद्युत वाहिनी दुरुस्त करण्यात आली. तर नागाळा पार्क उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने या उपकेंद्रातून बाहेर पडणार्‍या 11 केव्ही बिंदू चौक, भवानी मंडप या विद्युत वाहिन्यांचा वीजपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, भवानी मंडप, आदींसह परिसरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला. या परिसरात अन्य वाहिन्यांवरून वीजपुरवठा सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली. तर ट्रान्स्फॉर्मरचा बिघाड युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आला.