Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Kolhapur › चित्रपट महामंडळाच्या सभेला सापडेना मुहूर्त?

चित्रपट महामंडळाच्या सभेला सापडेना मुहूर्त?

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 10:47PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

सर्वसाधारण सभा या महिन्यात नाही, तर पुढच्या महिन्यात होईल, अशी उत्तरे ऐकून तीन वर्षे उलटली, तरी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त सापडलेला नाही. एप्रिल महिन्यात विद्यमान कार्यकारिणीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विद्यमान कार्यकारिणी 2015 साली निवडून आली. त्यावेळी असणार्‍या तत्कालीन संचालक मंडळाच्या कामकाजाविरोधात विद्यमान संचालकांतील काहींनी आंदोलन केले. प्रसंगी उपोषणही केले. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळाला चांगलेच धारेवर धरले होते. महामंडळाच्या निवडणुका झाल्या आणि नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. यात काही जुन्या संचालकांचाही समावेश होता. निवडून आल्यानंतर महामंडळासाठी काय कामे करणार, याची आश्‍वासने दिली गेली होती. त्यामुळे सभासदांना नवीन संचालकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण एक विशेष सर्वसाधारण सभा वगळली तर ज्यांनी अजून एकही सर्वसाधारण सभा घेतली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? असा सवाल आता सभासदांमधूनच उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या तीन वर्षांत महामंडळाने कामकाजाचा बर्‍यापैकी विस्तार केला आहे. अध्यक्ष मेघराज भोसले यांनी काही नवीन शाखा स्थापन करून कामकाजाचे विकेंद्रीकरण केले आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीचे काम पूर्णत्वासाठी पाठपुरावा केला आहे. 

असे असले तरी सर्वसाधारण सभा केव्हा होणार? याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने काही महिने जरी सर्वसाधारण सभेची तारीख लांबवली की, काही ठराविक सभासद गदारोळ करायचे; पण आता तेच सत्तेत आले, तेव्हा सभासदांना आपले मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असणारी सर्वसाधारण सभाही घेतली जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tags : Kolhapur, film corporation, fix, meeting, day