Fri, Jul 19, 2019 13:38होमपेज › Kolhapur › सावकाराच्या जाचाने शेतकर्‍याची आत्महत्या; चिठ्ठीसह झाडावर मांडली वेदना

सावकाराच्या जाचाने शेतकर्‍याची आत्महत्या; चिठ्ठीसह झाडावर मांडली वेदना

Published On: Jun 01 2018 7:50PM | Last Updated: Jun 01 2018 7:50PMतुरंबे : वार्ताहर

नरतवडे (ता. राधानगरी) येथील अशोक साताप्पा सुतार (वय 60) या  शेतकर्‍याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गावाशेजारील धोंडमाळ नावाच्या शेतात झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

‘शिंदे मास्तरच्या त्रासाला कंटाळूनच माझा पती गेला, मास्तरालाही फाशी लावा, त्याला अटक करा आणि मगच माझ्या नवर्‍याच्या प्रेताला हात लावा,’ असे म्हणत पत्नी आणि मुलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 

नरतवडे येथे अशोक सुतार हे पत्नी आक्‍काताई, दोन मुलगे आणि तीन मुलींसह राहत होते. त्यांनी गावातीलच रघुनाथ ज्ञानदेव शिंदे याच्याकडून सात वर्षांपूर्वी 10 टक्के व्याजाने 45 हजार रुपये घेतले होते. त्याची त्यांनी व्याजासह परतफेडही केली होती. तरीही शिंदे हा अशोक सुतार यांना सतत त्रास देत होता.  गुरुवारी रात्री शिंदे याने सुतार यांना फोन करून पुन्हा पैशाचा तगादा लावला. त्यामुळे गुरुवारपासूनच सुतार अस्वस्थ होते.  सकाळी सहा वाजता ते अंथरुणात दिसले नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी धोंडमाळ नावाच्या शेतातील झाडाला अशोक यांचा मृतदेह दिसून आला.

बायका-मुलांना न्याय मिळावा

अशोक सुतार यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, 2001 साली शिंदे याच्याकडून 45 हजार रुपये व्याजाने घेतले होते. 2005 पर्यंत वर्षाला फंडातील पैसे काढून 10 टक्क्यांप्रमाणे व्याज भागवले. 2005 साली मला राधानगरी येथे बोलवून एक लाख रुपयांचा दस्त करून घेतला. पुन्हा 2 मार्च 2011 रोजी दीड लाखांचा दुसरा दस्त केला, असा एकूण अडीच लाखांचा बोजा माझ्या शेतावर चढवला. 2013 मध्ये मी रिटायर झालो व त्यावेळी (मार्च 2014) 95 हजार रुपये त्याला दिले. तरीही त्याने शेतावरचा बोजा कमी करून दिला नाही. माझे 13 गुंठे रान त्यासाठी खरेदी करून घेतले. सगळीकडे त्याची माणसे असतात. खरेदी करण्यासाठी एजंट, जामीनदार, तलाठी यांना पैसे दिले की झाले. वकिलामार्फत मी नोटीस पाठवली, तरीही त्यांनी दाद दिली नाही. माझ्या घरी मुली आहेत म्हणून कधी भांडण केले नाही. त्याचा फायदा त्याने घेतला. माझे 13 गुंठे रान खरेदी करून घेतले आहे. तरी माझ्या बायका-मुलांना न्याय मिळावा, ही माझी कळकळीची विनंती आहे.

मी चाललो...

अशोक सुतार यांनी सकाळी सात वाजता आपला मुलगा गजानन याला फोन लावला व ‘तुम्ही निवांत रहा, मी चाललोय’, असे सांगितले. यावर हे अस्वस्थ कुटुंब हादरले व शेताकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सुतार यांनी गळफास लावून घेऊन आपली  जीवनयात्रा संपवली होती.

मास्तर तुला सोडणार नाही...

शिंदे मास्तर याच्या सावकारी तगाद्याने त्रस्त झालेल्या अशोक सुतार यांनी आत्महत्येपूर्वी आपली वेदना झाडावर खडूंनी लिहिली. ‘रघुनाथ शिंदे मास्तरनं मला बुडवले. माझं घरदार उद्ध्वस्त केलं. मास्तर तुला सोडणार नाही,’ असा आशय झाडावर लिहिला होता. याच झाडावर चिठ्ठीदेखील लिहून ठेवली होती.