होमपेज › Kolhapur › कर्जबाजारी शेतकर्‍याची नंदगावात आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची नंदगावात आत्महत्या

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 12 2018 12:27AMनंदगाव : वार्ताहर

नंदगाव (ता. करवीर) येथील राजेंद्र चंद्रकांत चौगले (वय 38) या शेतकर्‍याने कर्जबाजारी झाल्याने नैराश्येतून राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

वडील शेतीला पाणी पाजण्यासाठी गेले होते, तर आई व पत्नी पाणी भरत होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने माळ्यावर तुळईला गळफास लावून घेतला. पती घरात नसल्याचे पाहून जिन्यावरून माळ्यावर पत्नी गेली असता, पतीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

राजेंद्रने शेतीसोबतच जोडधंदा म्हणून  मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला होता; पण त्यामध्ये आर्थिक नुकसान झाल्याने तो निराश होता. यानंतर तो नंदगाव व परिसरातील किराणा दुकानदारांना लहान मुलांचे खाऊ पुरविण्याचे काम करीत होता. व्यवसायातील उधारी, थकलेली देणी यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा कुटुंबीय व नातेवाईकांनी त्याची समजून काढली होती. अखेर आज त्याने आपल्या जीवनाचा शेवट करून घेतला.

इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पोवार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  त्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.