Thu, Jan 24, 2019 05:37होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी किसान सभेचा मोर्चा

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी किसान सभेचा मोर्चा

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या वतीने मोठे आंदोलन झाले. शासनाने सरसकट कर्जमाफीचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दीड लाख रुपयांंपर्यंतची कर्जमाफी दिली. ही कर्ज माफीदेखील शेतकर्‍यांच्या पदरात पडली नाही. केवळ पीक कर्जापोटी दहा ते पंधरा हजार पर्यंतच्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला. अन्य शेतकरी अजूनही कर्जाच्या खाईत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.  
शेतीमालाला दीडपट हमीभाव देताना उत्पादन खर्च अधिक हमीभाव मिळाला पाहिजे, यंदा पाऊस जास्त पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पन्‍नास टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी येण्याची शक्यता आहे. ताबडतोब पीक पहाणी करून कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘ड’ फॉर्म भरण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत होती, पण त्याची माहिती अनेकांना नसल्याने ही मुदत वाढवण्यात यावी, 60 वर्षे पूर्ण केलेल्या शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना दरमहा पेन्शन देण्यात येणारे विधेयक मंजूर करण्यात यावे. श्रावणबाळ योजनेतील उत्पन्‍नाची अट काढून योजनेसाठी किमान 3000 रुपये अनुदान मंजूर करण्यात यावे. भूमिअधिग्रहण कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी व दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. 

 यावेळी नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, सतीश कांबळे, गिरीश फोंडे, नामदेव पाटील, वाय. एन. पाटील,  संजय पाटील, आनंदा सुतार, दिनकर सूर्यवंशी, बी. एल. बरगे, स्वाती क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.