Thu, Jul 18, 2019 00:24होमपेज › Kolhapur › भर उन्हात शेतकरी रस्त्यावर!

भर उन्हात शेतकरी रस्त्यावर!

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 01 2018 11:20PMकोल्हापूर : प्रतिनिधी

देवस्थान इनाम जमिनी कसणार्‍यांच्या नावे करून वारसा नोंदी तत्काळ करा, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली भर उन्हात शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी 1 जून 2017 ला ऐतिहासिक संप केला. यावेळी 89 लाख शेतकर्‍यांचा सात- बारा कोरा करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून जाचक निकष लावून शेतकर्‍यांना वंचित ठेवले आहे. देशात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले असताना पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात करून साखरेचे भाव पाडले जात आहेत. साखर कारखानदारांकडून 2500 रुपये प्रतिटन दर देण्यात येत असल्याने ऊस उत्पादकांना फटका बसला आहे. याबाबत सरकार काहीच बोलायला तयार नाही. 

कृषी विद्यापीठांनी गायीच्या दुधाला किमान 35 रुपये हमीभाव द्यावा, असे सूचविले असताना सरकारने 27 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तोही दूध संघाकडून देण्यात आलेला नाही. उलट प्रतिलिटर 10 रुपये कपात करण्यात आली आहे. 

6 ते 12 मार्च या कालावधीत पायी लाँग मार्च काढून आत्मक्लेष आंदोलन केले. यानंतर सरकारने सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. प्रधान सचिवांनी अंमलबजावणीचे पत्र दिले आहे. अधिवेशनात मंजुरी होऊनही याची अंमलबजावणी होत नाही. सरकार राज्यघटनेविरोधी कारभार करीत आहे, याचा निषेध करीत आहोत. कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे प्रकल्पातील पाण्याअभावी 40 गावांतील शेतकरी कुटुंबे बाधित झाली आहेत. पाटबंधारे खाते व सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसला आहे. 

आंदोलनात प्रा. डॉ. सुभाष जाधव, कॉ. सुभाष निकम, कॉ. मनोहर यरगट्टी, संभाजी यादव, नारायण गायकवाड, बाळासाहेब कामते आदी सहभागी झाले होते.