होमपेज › Kolhapur › कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा

कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. आतापर्यंत या लाभार्थ्यांना 333 कोटी 33 लाखांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर अजूनही 97 हजार 733 शेतकर्‍यांना 252 कोटी रुपये येणे बाकी आहेत. सध्या अपूर्ण अर्जांची त्रुटीपूर्तता सुरू असून आगामी अधिवेशनापूर्वी उर्वरित रक्‍कम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 70 हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरल्यानंतर संबंधित कर्जदारांना कर्जमाफी देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, कर्जमाफीने शेतकर्‍यांची दिवाळी काही गोड झाली नाही. कारण कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती घातल्याने या कर्जमाफीत चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे एकत्रिक कर्जमाफी न देता शासनाने टप्प्याटप्प्याने कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्या. दरम्यान, अधिवेशनाच्या काळात अर्ज न करताच आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफी देण्यात आली आणि पुन्हा कर्जमाफीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा आयटी विभागाने याद्यांची पडताळणी केल्यानंतर कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली आहे. कर्जमाफीच्या आतापर्यंत सहा याद्या प्रसिद्ध झाल्या असून, यामध्ये पूर्ण थकबाकीदार 18, 336 लाभार्थ्यांना 63 कोटी सहा लाख तर एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना 269 कोटी 73 लाख प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्याला एकूण 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची अपेक्षा असून आतापर्यंत यातील 333 कोटी 33 लाख  रुपये रक्‍कम मिळाली आहे.