होमपेज › Kolhapur › कर्जमाफी : अद्याप सावळा गोंधळ

कर्जमाफी : अद्याप सावळा गोंधळ

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:59PMकागल : बा. ल. वंदूरकर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीकरिता आलेले अर्ज आणि त्यातील चुका, उणिवा, याद्या दुरुस्त्या, संगणकीय चुका, पात्र, अपात्र, दुबार नावे, सतत निघाणारी वेगवेगळी शासकीय परिपत्रके, नावात चुका, फॉर्म भरताना झालेल्या चुका, आधार कार्डातील चुका अशा अनेक कारणांनी ऑडिटर, निबंधक कार्यालय, बँकेचे अधिकारी कर्मचारी, सेवा संस्थांचे सचिव अशा अनेकांमध्ये अद्यापही गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

कर्जमाफीच्या याद्या परिपूर्ण झाल्याचे अद्याप पर्यंत कोणीही ठोसपणे खात्री देऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या दुरुस्त करून दिलेल्या याद्या चौकशीकरिता जशाच्या तशाच पुन्हा कधी येतील याचा नेम उरला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या यंत्रणेत काम करणार्‍या अनेकांवर रात्री उशिरा जागून याद्यांचा ताळमेळ लावताना आजारी पडण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कागल तालुक्यातील जिल्हा बँकेच्या कर्जमाफी यादीनुसार 8 हजार शेतकर्‍यांना 18 कोटी 94 लाख रुपयांची आतापर्यंत कर्जमाफी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा आणखीन वाढणार आहे तर राष्ट्रीयीकृत बँकांतील आकडेवारी वेगळी आहे. कर्जमाफीसाठी अर्ज करून ही कर्जमाफी झाली नाही त्यांना दिलासा कधी मिळणार, असा प्रश्‍न सध्या शेतकर्‍यातून विचारला जात आहे.