Sun, Feb 23, 2020 11:30होमपेज › Kolhapur › कर्जमाफीतील जादा भरलेली रक्कम आता परत मिळणार

कर्जमाफीतील जादा भरलेली रक्कम आता परत मिळणार

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 11 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी कुटुंबाऐवजी व्यक्ती घटक मान्य करून कर्जमाफी देण्याचा निर्णय झाल्याने 31 जुलैपूर्वी कुटुंबामार्फत दीड लाखापेक्षा जास्त भरलेली रक्कम संबंधितांना परत मिळणार आहे. शुक्रवारी शासनाने यासंदर्भातील आदेश काढला. विधानसभेच्या अधिवेशनात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला होता. 

गेल्या वर्षी 20 जून रोजी ही योजना जाहीर झाली. त्यातील निकषात प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेली रक्कम भरल्यानंतर संबंधितांच्या खात्यांवर या योजनेचा लाभ म्हणून मिळणारी दीड लाखाची रक्कम जमा करण्यात येत होती. यामुळे कुटुंबाला लाभ झाला; पण त्याच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावांवर असलेले कर्ज तसेच राहिले. यावरून विरोधकांनी आंदोलन, मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन या निकषात बदल करताना कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखापर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नव्या निकषानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचललेले व 31 जुलै 2017 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार आहे. या निर्णयाने यापूर्वी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या नांवे दीड लाखापेक्षा जास्त असलेले कर्ज संबंधितांनी भरले असेल, तर त्यांना ते परत देण्यात येणार आहे. शासनाचे अवर सचिव तथा सहनिबंधक सहकारी संस्था रमेश शिंगटे यांनी हे आदेश आज काढले. 

एखाद्या कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावावर 2 लाख 20 हजार कर्ज असेल, तर त्यांना दीड लाखापेक्षा जास्त असलेली म्हणजे 50 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे; पण एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या नावावर अनुक्रमे 1 लाख 40 हजार व 70 हजारांचे कर्ज असेल, त्यांच्या एकत्रित कर्जाची रक्कम 2 लाख दहा हजार रुपये होते. त्यातील 60 हजार परत करावे लागणार आहेत. ही रक्कम कशी परत करायची याचा आलेखही या आदेशासोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे.