Thu, May 23, 2019 21:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कर्जमाफीबाबत लाभार्थ्यांत संभ्रम कायम

कर्जमाफीबाबत लाभार्थ्यांत संभ्रम कायम

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:01PMकागल : बा. ल. वंदूरकर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर होऊन वर्षाचा कालावधी होत आला, तरीदेखील शेतकरी, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यातील संभ्रमावस्था पूर्णपणे नाहीशी झाली नाही. शासनाकडून या कर्जमाफीबाबत अद्यापही सुधारणा व मार्गदर्शन करणारे आदेश आणि परिपत्रके निघत आहेत. आतापर्यंत सहा ते सात शासन निर्णय आणि आठ ते दहा परिपत्रके काढण्यात आली असली, तरीदेखील अद्यापही कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चुकीची दुरुस्ती करून पाठविण्यात आलेल्या यादीच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

राज्यातील शेतकर्‍यांनी मध्यंतरी कर्जमाफीसह इतर मागण्यांकरिता राज्यव्यापी आंदोलन पुकारले आणि शासनाने 28 जून 2017 रोजी आदेश काढून कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर या योजनेच्या प्रत्यक्षात अटी आणि शर्ती तसेच मार्गदर्शक सूचना काही दिवसांनंतर जाहीर केल्या. याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. त्यावेळी काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. 

आतापर्यर्ंत राज्य शासनाने या योजनेचे नियम आणि अटींचे अनेक वेळा शासन निर्णय काढले. तसेच बँकांनी कशा प्रकारे काम करायचे आणि कोणत्या बाबी अवलंबायच्या याबाबत परिपत्रकेदेखील अनेक वेळा काढली. या सर्व नव्या आणि जुन्या परिपत्रक आणि आदेशांचा घोळ मोठ्या प्रमाणात झाला. बरेच दिवस कोणाला फारसे कळत नव्हते. त्यामुळे बरेच दिवस संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यावेळीच पहिली ग्रीन यादी जाहीर झाली आणि कर्जमाफीचे पैसे बँकांमध्ये जमा होऊ लागले. तेव्हा शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

शासनाने कर्जमाफी योजनेचे बरेच आदेश आणि परिपत्रके काढूनदेखील अद्यापही राज्यातील लाखो शेतकरी ग्रीन लिस्टच्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आपण कर्जमाफीत पात्र आहोत की, अपात्र याबाबतची संभ्रमावस्था शेतकर्‍यांमध्ये कायम आहे.