Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चार लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 18 जणांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न सोमवारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी सव्वातीन वाजता झालेल्या या प्रकाराने पोलिसांची अक्षरश: भंबेरी उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेने अनर्थ टळला. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेली 20 वर्षे लढतोय, न्याय मागतोय, तो देत नाहीत, मग आता आम्ही मरू नाही तर काय करू, असा संतप्‍त सवाल आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या नरवेली (ता. गगनबावडा) येथील पडवळ कुटुंबीयांनी केला. न्याय देणारच नसाल, तर थेट धरणातच जलसमाधी घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नरवेली (पो. कातळी, ता. गगनबावडा) येथील प्रकाश मारुती पडवळ व संतोष श्रीपती पडवळ हे प्रकल्पग्रस्त आहेत. कुंभी धरणात त्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याचा मोबदला म्हणून त्यांना सांगशी (ता. गगनबावडा) येथील 8 एकर जमीन शासनाने प्रदान केली आहे. या जमिनीची कब्जेपाटी झाली आहे, त्याचे सात-बारा उतारेही झाले आहेत. रीतसर नावावर झालेली ही जमीन 

1997 पासून पडवळ कुटुंबीय कसत आहे. मात्र, भालचंद्र नानीवडेकर व मिलिंद नानीवडेकर हे या जमिनीवरील पीक घेऊन जात आहेत, सध्या तर धमकावून जमिनीतही येऊ देत नाहीत, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत, असा पडवळ कुटुंबीयांचा आरोप आहे. याबाबत सातत्याने वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने संपूर्ण कुटुंबानेच आत्मदहन करण्याचा इशारा 12 जून रोजी जिल्हा प्रशासनाला दिला होता.

या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने यंत्रणा सकाळी आठ वाजल्यापासूनच तैनात केली होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका प्रवेशद्वारावर रुग्णवाहिका आणि पोलिस व्हॅनसह कर्मचारी, तर दुसर्‍या प्रवेशद्वारावर अग्‍निशमन दलाचा बंब आणि पोलिस व्हॅनसह कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास 24 जणांच्या पडवळ कुटुंबीयांपैकी चार लहान मुलांसह 18 जण महावीर उद्यानाकडील प्रवेशद्वाराने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. प्रवेशद्वाराजवळ येताच घोषणा देत तीन महिला व तीन पुरुषांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. हे पाहताच  पोलिसांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली.

पोलिस येताच आंदोलनकर्ते वेगवेगळ्या दिशेला पळत सुटले. यामुळे पोलिसांची अक्षरश: भंबेरी उडाली. मात्र, त्यांनी समन्वय साधत आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आंदोलनकर्त्यांकडून रॉकेलचे डबे आणि काडीपेटी काढून घेत होते, तर आंदोलनकर्ते त्याला दाद देत नव्हते. सुमारे वीस मिनिटे झटापट सुरू होती. नेमके किती लोक आहेत, कोण कोठे आहे, हेदेखील समजत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी जादा कुमक मागवून घेतली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

महिला आक्रमक

तीन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. एक महिला काडीपेटी पेटवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, पोलिस कर्मचार्‍याने हातावर झटका मारल्याने ती काडीपेटी दूर फेकली गेली. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी महिलांना पकडून ठेवले होते. मात्र, त्यांच्या हातातून निसटण्याचा महिला वारंवार प्रयत्न करत होत्या. आता आम्हाला कशाला वाचवताय, न्याय देत नाही, त्यावेळी कारवाई करत नाही, आम्ही तर मरूनच चाललोय आणि आता ही कसली कारवाई करून दाखवतात, असे म्हणणार्‍या महिलांसमोर पोलिस कर्मचारीही निरुत्तर होत होते.

भेदरलेल्या चिमुरड्यांचा टाहो

आई-वडिलांसमवेत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुलांपैकी चार लहान मुले तर दहा वर्षांखालील होती. पोलिसांशी आई-वडिलांशी सुरू असलेली झटापट, आरडाओरड्याने ही मुले भेदरून गेली होती. सैरवैर पळताना त्यांनी फोडलेल्या टाहोने अनेकांना गहिवरून आले.

बघ्यांची प्रचंड गर्दी

या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील इतक्या मोठ्या संख्येने आत्मदहन करण्याची ही पहिलीच वेळ असावी. प्रचंड पोलिस, आंदोलक पुरुष-महिला आणि लहान मुले आणि बघ्यांची प्रचंड गर्दी, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासानंतर सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवले. या व्हॅनमध्येही एकाने टपाला डोके आपटून घेण्याचा प्रयत्न केला.

ही कसली लोकशाही?

सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिस अधिकार्‍याने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असला निर्णय का घेतला? न्याय मागण्याची ही काय पद्धत आहे का? लोकशाही मार्गाने न्याय मागता येतो, असे त्याने सांगताच आंदोलक महिला संतप्‍त झाल्या. आम्ही वीस वर्षे लोकशाही मार्गानेच लढतोय; पण तरीही न्याय मिळत नाही. कसली लोकशाही सांगता आणि आम्हालाच का लोकशाही सांगता. तक्रार केली तर तुमचेच पोलिस अधिकारी मोठ्यांच्या नादाला का लागता, असे आम्हालाच दरडावतात. तेव्हा कुठे असते लोकशाही? असा सवाल करताच पोलिस अधिकारीही निरुत्तर झाला.