Sun, Aug 25, 2019 04:33होमपेज › Kolhapur › माफीच्या साक्षीदारासाठी फळणीकर याचा नकार

माफीच्या साक्षीदारासाठी फळणीकर याचा नकार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या महेश फळणीकरने गुन्ह्यात माफीचा साक्षीदार होण्यास नकार दिला आहे. संशयितामार्फत त्याच्या वकिलांनी पनवेल मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांच्याकडे पत्र दाखल केले आहे.

दरम्यान, बिद्रे हत्येप्रकरणी चौकशी पथकाने कोल्हापुरातील एका तरुणासह तिघांना चौकशीकामी समन्स बजावून नवी मुंबईला बोलावून घेतले आहे. आज, मंगळवारी दिवसभर त्यांच्याकडे 
चौकशी सुरू होती. कोल्हापूर येथील तरुणाची यापूर्वीही राजवाडा पोलिस ठाण्यात तीन तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती.बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित व निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरचा विश्‍वासू व जिवलग मित्र असलेल्या महेश फळणीकरचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. फळणीकरच्या चौकशीत धक्‍कादायक माहिती उघड झाली होती.

संशयिताविरुद्ध न्यायालयात भक्‍कम पुरावे उपलब्ध करण्यासाठी 164 अन्वये फळणीकरचा न्यायालयात कबुली जबाब नोंदविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पनवेल मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे याबाबतचे पत्रही दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने फळणीकरला याबाबत विचारणा केली होती. फळणीकरने वकिलामार्फत न्यायालयाला पत्र दाखल करून माफीचा साक्षीदार होण्यास नकार दिला आहे.

अत्याधुनिक उपकरण दाखल होताच मृतदेहाचा शोध

बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी अत्याधुनिक ‘ग्रॅडिओमीटर’ उपकरणाची मदत घेण्यास व होणार्‍या खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबईतील एका प्रख्यात कंपनीशी शासनाने करारही केला आहे. हे उपकरण अमेरिकेत उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत दाखल झाल्यानंतर पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Falnikar, Apology witness,Ashwini Bidre murder case


  •