होमपेज › Kolhapur › नोकरीसाठी ‘फेसबुकही महत्त्वाचा फॅक्टर’

नोकरीसाठी ‘फेसबुकही महत्त्वाचा फॅक्टर’

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:41PMकोल्हापूर : पूनम देशमुख

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना किंवा पोस्ट शेअर करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचा प्रत्यय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला येत आहे. नोकरीसाठी दिले जाणारे अर्ज, बायोडाटासह कंपन्या संबंधित उमेदवाराचे फेसबुक प्रोफाईलही तपासत आहेत. यातून उमेदवारांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे. नकारात्मक किंवा चुकीचे तपशील आढळल्यास त्याला नोकरीचे दरवाजे बंद होत आहेत.

अर्ज करणार्‍या उमेदवाराची पार्श्‍वभूमी तपासण्याच्या कंपन्यांच्या या पध्द्धतीमुळे आतापर्यत अनेकांना मिळणारी नोकरी गमवण्याची वेळ आल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ऑनलाईन जॉब पोर्टल असणार्‍या करिअर बिल्डर इंडियातर्फे हा सर्व्हे करण्यात आला.त्यात 59 टक्के उमेदवारांनी नोकरी मिळवण्यासाठी आपली पसंती सोशल मीडियालाच असल्याचे म्हटले आहे.तर 33 टक्के उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याची तयारी दर्शवली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे 68 टक्के कंपन्यांनी उमेदवारांचे फेसबुक प्रोफाईल तपासून त्यांना नकार दर्शवल्याचेही समोर आले आहे. देशांतील 1200 टॉप कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. 

उमेदवाराकडून अर्जामध्ये नमूद करण्यात आलेली चुकीची शैक्षणिक पात्रता (50टक्के ) हे नोकरी नाकारण्यामध्ये प्रमुख कारण आहे.त्यानंतर संवाद कौशल्यांचा अभाव (50 टक्के), चुकीचे अथवा बनावट फोटो जोडणे (47 टक्के), मागील नोकरीविषयी महत्त्वाची माहिती दडवणे (42 टक्के), दारू अथवा अमंली पदार्थांच्या सवयी माहिती दडवणे (38 टक्के), गुन्हेगारी कृत्यात अडकणे (35 टक्के), मागील कंपनी सोडण्याची खोटी कारणे देणे (32 टक्के) आदी कारणांचा त्यात समावेश आहे.

नोकरी मिळवण्यासाठी खटाटोप करणार्‍यांनी अर्जात दिलेली माहिती आणि सोशल मीडियावर टाकलेली माहिती पडताळून पाहण्याची गरज आहे. दोन्ही माहितीमध्ये तफावत असली तरी नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती करिअर बिल्डर ह्युमन रिसोर्सेसचे उपाध्यक्ष रोझमेरी हॅफ्नर यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर अर्ज करणार्‍यांनी सोशल मीडिया वापरताना दक्ष आणि सावध राहण्याची गरज आहे. कोणतीही वैयक्‍तिक माहिती इंटरनेटवर अपलोड करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

व्यावसायिक गुणवत्तेची परीक्षा

या सर्वेक्षणामध्ये विविध कंपन्यांशी चर्चा करता संबंधित उमेदवारांच्या व्यावसायिक गुणवत्तेची पारख करण्यासाठी त्याची वैयक्‍तिक पार्श्‍वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाईल अभ्यासण्यात येतात. यावरून त्यांना घ्यायचे की नाही हे ठरवण्यात येते. त्यात त्यांचे व्यक्‍तिमत्त्व, संवादकौशल्य, आदींची पारख करता येते. याबाबी कंपनीच्या व्यक्‍तिरेखेशी जुळल्या की त्यांची निवड केली जाते.