Wed, Jan 23, 2019 06:58होमपेज › Kolhapur › राजरोस शेकडो वृक्षांची होतेय कत्तल

राजरोस शेकडो वृक्षांची होतेय कत्तल

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 11:51PMकोल्हापूर : विजय पाटील 

वाहनातून जाताना दुतर्फा मागे पळणारी गगनचुंबी हिरवीगार झाडे. वाटेत  दिसणारे हिरवाकंच फेटा बांधल्यासारखे डोंगरमाथ्याचे तुर्रेदार सौंदर्य. झाडेच झाडे सगळीकडे असे द‍ृश्य कोल्हापुरातील राधानगरी, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी आदी परिसरासह जंगलक्षेत्रात दिसायचे; पण अलीकडे लाकूडतस्करांनी हातपाय पसरले आहेत. शेकडो झाडांची कत्तल रात्री करून ओंडके भरलेले ट्रक रवाना केले जात आहेत. त्यामुळे अनेक डोंगर ऐन पावसाळ्यात बोडके दिसू लागले, तर सहा महिन्यांपूर्वी दिसणारी रस्त्यावरची दुतर्फा झाडेही गायब झाल्याच्या तक्रारी प्रवासी, नागरिक करू लागले आहेत. या चोरट्या वृक्षतोडीला अभय कुणाचे, असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे.  

वृक्षतोड ही चोरीछुपे कायम सुरू असते. वृक्षतोडीचे अर्थकारणही मोठे आहे; पण यापूर्वी कुर्‍हाडीने झाडे तोडली जात असल्याने तोडीचा वेग कमी दिसत होता. पण अलीकडे नवे कटर आल्याने काही मिनिटांत भल्यामोठ्या झाडाचे ओंडके ट्रकमध्ये बसवले जातात. नरक्या तस्करीसाठी एकेकाळी जिल्हा गाजला होता; पण अजूनही नरक्याची तस्करी होते. रक्‍तचंदनाची तस्करीही सहज केली जात असल्याच्या चर्चा आहेत. चंदनाची झाडे कधी तुटतात हे समजतसुद्धा नाही. ज्याचे लाकूड घरसजावटीसाठी वापरले जाते, या झाडांची अवस्था कत्तलखाण्यातील गुलाल लावलेल्या बकर्‍यासारखी आहे. कारण दोन दिवसांपूर्वी दिसणारी झाडे नंतर एका ओळीने तुटलेली दिसतात. चौकशी केली तर याची उत्तरे मिळत नाहीत. कारण यासाठी तस्करांची साखळीच कार्यरत असते.