Wed, Apr 24, 2019 07:50होमपेज › Kolhapur › चला गं मंगळागौरीचा या करूया जागर... 

चला गं मंगळागौरीचा या करूया जागर... 

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 10:59PM
कोल्हापूर : प्रिया सरीकर
आयानो या गं बायानो 
शेजारणींनो या गं या...

चला गं मंगळागौरीचा या करूया जागर....अगदी असाच पै पाहुण्यांतील महिला, मुली, शेजारी राहणार्‍या महिलांनी मिळून श्रावणातील चारही मंगळवार मंगळागौर जागवली जात होती. पण आता मंगळागौरीचा सण इव्हेंट म्हणून साजरा होत आहे. नव्या सुनेच्या कोडकौतुकाचा हा सोहळा अगदी ट्रेन्डी आणि मॉडर्न बनला आहे. मंगळा गौरीच्या इव्हेंटसाठी थीम तर ठरवली जातेच शिवाय जागरासाठी झिम्मा-फुगडी स्पर्धेसाठी जाणार्‍या ग्रुपना बोलवून रात्र जागवली जात आहे. मंगळागौरीचा इव्हेंट झाला असला तरी पारंपरिक सण साजरा करण्यासोबतच गौरीच्या खेळाचे जतन मात्र यातून नक्कीच केले जात आहे. 

भारतीय सणांला शास्त्रीय आधार आहे. पूर्वीच्या काळी पावसाच्या दिवसात महिलांचे घराबाहेर पडणे क्वचीतच घडत असे. घरीच राहिल्याने त्यांचा फारसा व्यायमही होत नसे. अशा दिवसात घरातील कामकाज अटोपून महिला एकत्र जमून पंचमीची गीते, गौरी गीते, झिम्मा खेळायच्या यातून त्यांचा व्यायाम तर व्हायचा शिवाय गौरी गीतांच्या रचनेतून परंपरा आणि संस्कृतीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. आता महिला सगळ्याच ऋतूमध्ये कामांनी घेरलेल्या दिसतात. घरासोबतच ऑफिस, व्यवसाय अशा अनेक जबाबदार्‍यांमुळे सण वार साजरे करतानाच त्यांची कसरत होते. तरीही सण साजरा करण्याची त्यांचा उत्साह मात्र कायम असतो. अनेक घरांत परंपरेने  श्रावणातील चार मंगळवार मंगळागौरीचे व्रत केले जाते.