Thu, Jul 18, 2019 04:43



होमपेज › Kolhapur › आजही पंचेचाळीस गावांत होडीतून प्रवास!

आजही पंचेचाळीस गावांत होडीतून प्रवास!

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:42PM



राशिवडे : प्रवीण ढोणे

पूर्वी दळणवळणाच्या पुरेशा सोयी नसल्याने एकतर पायी प्रवास व नदी असेल तर नावेतून प्रवास हे ठरलेलेच. सध्याच्या गतिमान युगामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी प्रवासासाठी नावेचा आधार घेतला जात असून जिल्ह्यातील पंचेचाळीस गावांमध्ये आजही नावेतून प्रवास सुरू आहे. सर्वाधिक नावेचा वापर शिरोळ तालुक्यामध्ये केला जात आहे. या तालुक्यातील सतरा गावांना अद्यापही जिल्हा परिषदेकडून नावा पुरविल्या जात आहेत.

जिल्ह्यामध्ये 1217 गावे असून बारा तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुमारे 6531 कि.मी. अंतराचे रस्ते आहेत. त्यामध्ये 3211 कि.मी. रस्ते डांबरीकरणाचे असून 1213 कि. मी. रस्ते मुरूमीकरणाचे तर 641 कि. मी. रस्ते अपृष्टांकित आहेत. जिल्ह्यातून सर्वात मोठी पंचगंगा नदी त्यापाठोपाठ भोगावती, तुळशी, कुंभी, कासारी, तुळशी, धामणी, वारणा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कृष्णा या नद्या वाहतात. पावसाळ्यामध्ये या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत असतात, त्यामुळे बहुतांश मार्ग बंद होतात. यादरम्यान तसेच नियमित दळणवळणासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून नावाचे वाटप केले जाते.

नावांचा वापर करणार्‍या गावांची नावे पुढीलप्रमाणे : करवीर तालुका - कसबा बीड, गाडेगोंडवाडी. गडहिंग्लज तालुका - डोणेवाडी, कौलगे, हिटणी. चंदगड तालुका - कालकुद्री, धुमडेवाडी. शिरोळ तालुका - नृसिंहवाडी, गणेशवाडी, जुने दानवाड, राजापूर, राजापूरवाडी, धरणगुत्ती, कनवाड, खिद्रापूर, शिरढोण, आलास, बस्तवाड. पन्हाळा तालुका - कसबा ठाणे, नणुंद्रे, बोरगाव, देसाईवाडी, देवठाणे, कोलोली, परखंदळे. गगनबावडा तालुका - गोठे, मणदूर, धुंदवडे, वेतवडे. कागल तालुका - चिखली, बेलवळे बुद्रुक. हातकणंगले तालुका - घुणकी, निलेवाडी, चंदूर, खोची, चावरे. राधानगरी तालुका - येळवडे, आवळी बुद्रुक. शाहूवाडी तालुका - कापशी, थेरगाव. प्रामुख्याने दळणवळणांची पुरेशी साधने उपलब्ध असतानाही केवळ पर्यायी मार्ग अथवा शॉर्टकट म्हणून नावेचा वापर केला जात आहे.