Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Kolhapur › इंद्रजित बोंद्रेंची अधिकार्‍यांना शिवीगाळ

इंद्रजित बोंद्रेंची अधिकार्‍यांना शिवीगाळ

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 09 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

संभाजीनगर, आयटीआय ते पाचगाव रोडवरील हनुमाननगर येथील अतिक्रमित केबिन काढताना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी शुक्रवारी अधिकार्‍यांना फोनवरून शिवीगाळ केली. तसेच केबिन काढल्यास बघून घेण्याचीही धमकी देऊन दबाव टाकला. उपशहर अभियंता रमेश मस्कर व अतिक्रमण विभागप्रमुख पंडितराव पोवार यांना बोंद्रे यांनी शिवीगाळ केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, महापालिकेतील रोजंदार कर्मचारी वीरविजय शिंदे यानेच अतिक्रमण करून केबिन घातली होती; परंतु बोंद्रे यांच्या दबावाला बळी न पडता अधिकार्‍यांनी संबंधित केबिन जेसीबीने अक्षरशः उद्ध्वस्त केली. 

हनुमाननगर चौक परिसरातील सहा केबिन हटविल्यानंतर शिंदे यांची केबिन हटविण्याची कारवाई सुरू होती. त्यावेळी शिंदे यांनी बोंद्रे यांना फोन केला. बोंद्रे यांनी मस्कर यांना फोनकरून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर मस्कर यांच्यासह पोवार यांना, तुमची लय नाटके चालली आहेत, तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर बोंद्रे यांनी शिंदेची केबिन काढल्यास बघून घेण्याचीही धमकी दिली. पोवार यांनी बोंद्रे यांचे बोलणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. बोंद्रे यांच्या दबावामुळे अधिकार्‍यांनी काही काळ मोहीम थांबविली होती; परंतु काही काळानंतर शिंदे यांची केबिन जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली. बोंद्रे यांनी शिवीगाळ केलेल्या रेकॉर्डिंगनुसार आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पोवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

दरम्यान, शुक्रवारी दिवसभराच्या कारवाईत एकूण 32 केबिन व शेड, 43 डिजिटल बोर्ड हटविण्यात आली. आयटीआय ते रायगड कॉलनी, निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम, भारती विद्यापीठ परिसर आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. दोन जेसीबी, तीन डंपरसह सुमारे पन्नासहून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.